कोल्हापूर : भारदस्त आवाजाच्या साथीने डफावरची जोरदार थाप अन् विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणारे पोवाडे सादर करीत शाहिरांनी पोवाडाप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे केले़ इतिहास, राष्ट्रभक्ती, अंधश्रद्धा, राजकारण या विषयांना कवनात बंदिस्त करीत शाहीर हा एक प्रकारचा प्रबोधनकार असल्याची प्रचिती या कलाकारांनी आणून दिली़ निमित्त होते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या स्मृतिदिनामित्त आज, मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापुरी शाहिरी महोत्सवाचे.़़राम गणेश गडकरी सभागृहामध्ये झालेल्या या महोत्सवात बालशाहीर संकेत पाटील, शिवशाहीर रंगराव पाटील (महेकर), सर्जेराव टिपुगडे, राजू राऊत, सदाशिव निकम, दिलीप सावंत, रंगराव पाटील, बाबूराव कांबळे, धोंडिराम मगदूम व सहकाऱ्यांनी पोवाडे सादर केले़ मुजरा मानाचा माझा शाहिराचा महाराष्ट्राच्या चरणाला, मुजरा माझा मानाचा शिवछत्रपती महाराजांना, असा नसावा शोधुनी पाहावा़़ श्रोता परीक्षक असावा़़. या पोवाड्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़शाहिरांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, तसेच फुले-शाहू-आंबेडकर यांचे संदेश सादर केले़ शाहीर दिलीप सावंत यांनी ‘शिवशाहू-फुले-आंबेडकर कधी आम्हाला कळले, सत्ता, राजकारण जातीसाठी फक्त आम्ही वापरले, हा पोवाडा सादर केला़ यावेळी शाहीर देवानंद माळी, शहाजी माळी, पापालाल नायकवडी, ठोमरे वस्ताद, दिग्दर्शक यशवंत भालकर, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, व्ही़ बी़ पाटील, आदी उपस्थित होते़ शिवशाहीर आझाद नायकवडी यांच्या ‘पिराजी सरनाईक विख्यात दादा विख्यात, गाजली शाहिरी दहा मुलखांत’ या पोवाड्याने महोत्सवाची सांगता झाली़ सकाळी अर्धा शिवाजी पुतळा येथून शाहीर पिराजी सरनाईक यांचे शाहिरी साहित्य पालखीमधून गडकरी हॉलपर्यंत आणण्यात आले़ या ठिक ाणी महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण, चंद्रकांत घाटगे, वसंत कोगेकर, परीक्षित पन्हाळकर, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, आदी उपस्थित होते़ भाकड जनावराला कुणी पोसत नाही. अडगळीची वस्तू कुणी समोर ठेवत नाही, जीर्ण सदरा कुणी वापरत नाही. मात्र, कोल्हापूर मनपाने वृद्धापकाळातील अवहेलनेच्या वेळी ‘शाहीर पिराजी सरनाईक पुरस्कार’ देऊन सत्कार केल्यामुळे माझा खरा अर्थाने सन्मान झाला, असे मत ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांना शाहीर पिराजीराव सरनाईक हा पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते महापालिकेतर्फे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख २१ हजार रुपये देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. महोत्सवामध्ये बालशाहीर संकेत पाटील, शाहीर सर्जेराव टिपुगडे, रंगराव पाटील, सदाशिव निकम, राजू राऊत, दिलीप सावंत, बाबूराव कांबळे, धोंडिराम मगदूम, रंगराव पाटील, आझाद नायकवडी पिराजी सरनाईक यांचे नातू अमर सरनाईक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरबार आज भरला....‘दरबार आज भरला शाहिरी अस्मितेचा सन्मान होय माझाहा योग अमृताचा बहुजनांचा राजाराजर्षी शाहू राजा खरा कोल्हापूरच्या रसिकजनता तुला मानाचा मुजरा धन्य पिराजी तुला मानाचा मुजरा....’अशा शब्दांत ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांनी आपल्या तडफदार आवाजात पुरस्काराला उत्तर दिले. उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.
शाहिरीतून समाजप्रबोधनाचा जागर
By admin | Published: December 30, 2014 11:56 PM