प्रशांत कोडणीकर-- नृसिंहवाडी- येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत़ यानिमित्त लाखो भाविक हजेरी लावणार असल्याने सुसज्ज पार्किंगची गरज भासणार आहे. यासाठी उपसरपंच धनाजीराव जगदाळे व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वत:ची पाच एकर जागा नि:शुल्कपणे उपलब्ध करून दिली आहे़ या जागेत शासनाकडून वाहन पार्किंगस्थळ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नि:स्वार्थ भावनेने शेती उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्ह्यातून जगदाळे यांचे कौतुक होत आहे़ श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त दर्शनाकरिता पौर्णिमा, अमावास्या, संकष्टी, उन्हाळ्याची सुटी, श्री दत्त जयंतीनिमित्त दररोज शेकडो भाविक भेट देत असतात़ दिवसेंदिवस भाविक व पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे़ त्यातच ११ आॅगस्ट २०१६ पासून कन्यागत महापर्वकाळ सुरू होत आहे़ हा पर्वकाळ वर्षभर सुरू राहणार असल्याने लाखो भाविक या पर्वकाळानिमित्त नृसिंहवाडी येथे भेटी देणार असल्याचा अंदाज असल्याने त्यांच्या वाहन पार्किंगकरिता ग्रामपंचायतीकडे वाहन पार्किंगची सोय आहे़ मात्र, ती अपुरी असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यालगत गावाशेजारी जगदाळे यांच्या शेतजमिनीमध्ये पार्किंगची सोय केली आहे़ त्यासाठी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे़ आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक पार्किंगचे काम झाले असून, महिनाअखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे़ पाच एकरच्या या जागेमध्ये संपूर्ण क्षेत्र मुरमीकरण, अंतर्गत रस्ते, ठिकठिकाणी वृक्षारोपण, स्टोन गार्ड, आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ तसेच भाविकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या पार्किंगची सोय व्हावी याकरिता आमदार उल्हास पाटील यांनी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे़पार्किंगकरिता जागा उपलब्ध व्हावी, यासाठी येथील जगदाळे कुटुंबीयांनी स्वत:च्या मालकीची पाच एकर जागा विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे़ त्यामुळे वाहनधारकांची चांगली सोय होऊन वाहन सुरक्षित राहणार आहे़ जिल्हा परिषद व ग्रामपंचायत पार्किंगची सोय करीत असल्याने भाविक व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे़ दरम्यान, पार्किंगचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, तसेच काम दर्जात्मक होण्यासाठी पंचायत समितीचे शाखा अभियंता ए़ एस़ खोत व सरपंच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांची देखरेख आहे़ आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक पार्किंगचे काम झाले आहे़ पाच एकरच्या या जागेमध्ये संपूर्ण क्षेत्र मुरमीकरण, अंतर्गत रस्ते, ठिकठिकाणी वृक्षारोपण, स्टोन गार्ड आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़
पार्किंगसाठी जगदाळे कुटुंबीयांचा पुढाकार
By admin | Published: June 16, 2016 9:39 PM