लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये आठवड्यात क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली आहे. गुजरात व राजस्थान मार्केटमध्ये मागणी घटल्याने व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याचा परिणाम दरावर झाला आहे. पाच व १० किलोंच्या रव्याचा सरासरी दर ३८५० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा उसाची एफआरपी वाढल्याने गूळही तेजीत राहील, असा अंदाज होता. हंगामाच्या सुरुवातीला गुळाला चांगली मागणी राहिल्याने दरही साडेचार हजारांपर्यंत कायम राहिला. हंगाम जसा पुढे गेला आणि आवक वाढत गेल्यानंतर दर खाली येऊ लागले. मात्र गेल्या आठवड्यापर्यंत सरासरी दर हा ४२०० रुपये क्विंटलपर्यंत होता. शुक्रवार (दि. ११) पासून तो चार हजार रुपयांच्या खाली येण्यास सुरुवात झाली. मंगळवारी २० हजार गूळरव्यांची आवक झाली आणि किमान दर ३७०५ रुपयांपर्यंत खाली आला.
किलोच्या रव्याचा दर ३३०० रुपये
एक किलो गूळ रव्यांची आवकही मोठ्या प्रमाणात होते. बाजार समितीत रोज १८ ते २० हजार बॉक्सची आवक होते. मात्र सरासरी दर प्रतिक्विंटल ३३०० रुपये राहिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
सौद्याचे नियोजनही विस्कटले
बाजार समितीत सौद्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार एका लायसेन्सला आठ मिनिटे असे सौद्याच्या कालावधीत २८ लायसेन्स व्हायची. मात्र अलीकडे वेळेचे नियोजन विस्कटल्याने व्यापाऱ्यांना ज्या दुकानातील माल घ्यायचा आहे, तिथेपर्यंत सौदाच न पोहोचल्याने गुळाची खरेदी होत नाही, हाही दर घसरण्यामागील एक कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
गुळाचा दरदाम असा -
दिनांक आवक रवे किमान कमाल सरासरी दर
९ डिसेंबर २२,४७२ ३९०५ ४१९० ४०५०
१५ डिसेंबर २०,३१३ ३७०५ ४१०० ३८५०
- राजाराम लोंढे