लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरात रस्ता हस्तांतरणावरून खलबत्ते सुरू असतानाच शहरात राबविल्या जाणाऱ्या भुयारी गटार प्रकल्पावरून आता समज-गैरसमज निर्माण होत आहेत. योजना नेमकी कशी आहे, याबाबत पालिकेकडून माहिती देण्याची गरज बनली आहे. रस्ता हस्तांतरणाप्रमाणे भुयारी गटार योजनादेखील वादात सापडू नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. गेल्या २२ वर्षांत वाढीव वसाहतीमुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी, शहराला भुयारी गटार योजनेची गरज भासू लागल्याने व आरोग्याच्या दृष्टीने भुयारी गटार योजना महत्त्वाची असल्याने नगरपालिकेने अपेक्षित असणारी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. मागील सभागृहात ठराव मंजूर झाला होता. जानेवारी २०१६ मध्ये जीवन प्राधिकरण विभागाने या योजनेस तांत्रिक मान्यता दिली होती. ३० मार्च २०१७ ला मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या प्रकल्पास मंजुरी मिळाली. यामुळे ही योजना होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पहिल्या टप्प्यात १२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून नगरपालिकेला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाची सुमारे ५६ कोटी ५२ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर पालिका सभेत ठराव होऊन योजनेचा नारळ फुटणार आहे. असे असले तरी सध्या भुयारी गटार प्रकल्पावरून शहरात समज-गैरसमज निर्माण होत आहेत. योजना राबवित असताना शहरात टाकण्यात येणारी नलिका कोठून जाणार, रस्त्यांचे काय होणार? याबाबत मोठा ऊहापोह होत आहे. त्यामुळे या योजनेला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जयसिंगपुरात भुयारी गटार प्रकल्प वादात?
By admin | Published: June 12, 2017 12:53 AM