कोल्हापूर : युवतींचे झांजपथक आणि महिलांचे लेझीम पथक अशा उत्साही वातावरणात रविवारी महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चांदीच्या रथामध्ये व घोडे-बग्गीमध्ये बसण्याचा सन्मान अनिल अण्णासो पाटील परिवाराला मिळाला.भगवान महावीर प्रतिष्ठानतर्फे, गेले दोन दिवस भगवान महावीर जयंती महोत्सव सुरू होता. रविवारी सकाळी गंगावेश, कसबा गेट येथील मानस्तंभ जिनमंदिरात भगवान महावीर यांचा जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी महावीरांची माता होण्याचा सन्मान नेहा पारस शेटे यांना मिळाला. त्यानंतर मानस्तंभ जिनमंदिरातून पालखी प्रतिमापूजन व रथपूजन शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या हस्ते व महावीर गाठ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत सांगवडेकर, सचिव सुरेश मगदूम, आनंद पाटणे, भरत घोडके, विद्यासागर चौगुले, सुनील डुणुंग, आदींच्या उपस्थितीत झाले.त्यानंतर पालखी मिरवणूक शिवाजी चौक, बिंदू चौक, गुजरी, पापाची तिकटी, पानलाईन, महापालिका चौक, अयोध्या टॉकीजमार्गे दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंग येथे येऊन विसर्जित झाली. मिरवणूक मार्गावर भक्तांना सरबत व ताक वाटप करण्यात आले. डॉ. महावीर मिठारी यांनी रुग्णवाहिकेची सोय केली होती. या ठिकाणी ५०० जणांना प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले, नगरसेवक राहुल चव्हाण, ईश्वर परमार, माजी नगरसेवक राजेश लाटकर उपस्थित होते. भरत वणकुद्रे व महावीर सन्नके यांच्या मार्गदर्शनाखाली जैन सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी याचे नियोजन केले होते.दुपारी दिगंबर जैन बोर्डिंगमधील सभागृहात पुण्याच्या अंजली शहा यांचा ‘कथांजली’ हा कथाकथनाचा कार्यक्रम झाला. यावेळी श्रावक-श्राविक विजय कोगनोळे व आनंद पाटणे यांचा सपत्निक सत्कार तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कार, वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी झाला. यावेळी सुषमा रोटे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. महावीर मिठारी व वनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महापालिकेतर्फे छत्रपती ताराराणी सभागृहात भगवान महावीर यांच्या प्रतिमेस महापौर हसिना फरास यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जैन बांधव न्हाले भक्तिरसात !
By admin | Published: April 10, 2017 12:58 AM