कोल्हापूर : आकर्षक फुलांनी सजविलेल्या बैलगाड्या, चांदीचा रथ, आपलं कोल्हापूर... करवीर नाद या ढोलपथक ांच्या गजरात जैन श्वेतांबर मंदिरातर्फे भक्तिमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.श्री मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिराच्या अमृतमहोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्ताने गुरुवारी शहरातून समाजबांधवांतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य श्रेयांसप्रभसुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शोभायात्रेत सुमारे दोन हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.या शोभायात्रेत ७५ वर्षांपूर्वी मंदिराचा कलशारोहण, प्रतिष्ठापना ते आजपर्यंतच्या विविध महत्त्वाच्या प्रसंगी काढण्यात आलेली छायाचित्रे ठेवलेला रथ महत्त्वाचे आकर्षण ठरला. तसेच पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या दहा बैलगाड्या, उंट, घोडे, जुन्या, दुर्मीळ चारचाकी गाडींचा समावेश यामध्ये होता. चांदीच्या रथामध्ये श्री पार्श्वनाथ भगवंतांचा फोटो ठेवण्यात आला होता. लक्ष्मीपुरी येथील मंदिर ते बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, महाराणा प्रताप चौक ते पुन्हा मंदिर या मार्गावरून निघालेल्या शोभायात्रेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमधून जैन बांधव सहभागी झाले. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मंदिरात गेल्या शुक्रवार (दि. ४)पासून ‘अष्टान्हिका जिनेंद्र महोत्सव’ सुरू असून, दररोज पूजा-अर्चा व तत्सम धार्मिक विधी सुरू आहेत. यामध्ये गुरुवारी सकाळी प्रभातीया, प्रवचन, पालखी, शांतिस्नान पूजन, मेहंदी वितरण सोहळा, रात्री गायक अनिल गेमावत यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. श्री मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टमार्फत प्रत्येक वर्षी धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. चातुर्मास व पर्यूषण पर्वाच्या निमित्ताने कार्यक्रम राबविले जातात. आज, शुुक्रवारी अमृतमहोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी होणार आहे.
जैन श्वेतांबर मंदिराचीशोभायात्रा
By admin | Published: March 11, 2016 12:03 AM