गांधीनगर : आज सहिष्णुतेचा विचार मांडण्याची गरज असून महाराष्ट्र व मराठी भाषा यांचा प्राचीनतेपासून जैनसंस्कृतीशी निकटचा ऋणानुबंध आहे. इ.स.पूर्वपासून जैन धर्माने मराठी प्राकृत भाषा जोपासली आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
ते चिंचवाड (ता. करवीर) येथे आयोजित केलेल्या डॉ. रावसाहेब पाटील गौरव समारंभ व गौरव पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ऋतुराज पाटील होते.
कोकाटे पुढे म्हणाले, डॉ. रावसो पाटील हे सुदीर्घ ज्ञानसाधना, अद्भुत व अलौकिक कल्पनाशक्ती, अनुभव समृद्ध व इतिहासाचा वेध घेणारी दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. रावसो पाटील म्हणाले, जैनधर्म व जैन तत्त्वाज्ञानाचा माझ्या जीवनावर खोलवर परिणाम झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात असूनसुद्धा समाजप्रबोधन व ज्ञानदानाचे काम सातत्याने करीत राहिलो. यावेळी प्रा. डी. ए. पाटील, रामचंद्र नांद्रे गुरुजी, प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवयित्री निलम माणगावे, कवीश्री विजय बेळंके, लेखक विजय आवटी, आण्णासो ठिकणे, सिद्धोजीराव रणनवरे, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, सुरेश रोटे, दीपक मगदूम, मिहिर गांधी, डॉ. पद्मजा पाटील, श्रेणिक पाटील उपस्थित होते.
फोटो १९ गांधीनगर कोकाटे
ओळ- चिंचवाड (ता करवीर) येथे आयोजित डॉ. रावसाहेब पाटील यांचा गौरव व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास आमदार ऋतुराज पाटील , संजय पाटील, डॉ. श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते.