कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत साकारलेला खलनायक, चरित्र अभिनय, सहदिग्दर्शन आणि तत्कालीन परिस्थिती हा कालखंड संकेतस्थळाच्या रूपाने आजच्या पिढीसमोर येत आहे. ही बाब म्हणजे मुलांकडून वडिलांचा केला जाणारा कृतज्ञतापूर्वक गौरवच म्हणावा लागेल. हा कालखंडच जणू मंतरलेला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी केले. दानवे यांच्या कुटुंबीयांतर्फे शाहू स्मारक भवन येथे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भास्कर जाधव होते.जोशी म्हणाले, आजच्या पिढीला राणी एलिझाबेथ, व्हिक्टोरिया, लॉर्ड कॅनिंग अशा इंग्रजांच्या काळातील नावे व सनावळ्या तोंडपाठ आहेत. मात्र, आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचा इतिहास माहीत नाही. ही बाब जाणून त्यांच्या कन्या जयश्री आणि मुलगा राजवर्धन यांनी ते दिसायचे कसे, त्यांच्या अभिनयाची शैली, त्यांचे संवादफेक कौशल्य आणि त्यांचे मराठी रंगभूमी व मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील वेगवेगळे पैलू या संकेतस्थळाच्या रूपाने नव्या पिढीसमोर मांडले आहेत. ही बाब म्हणजे त्यांची कारकिर्द नव्हे, तर त्यांचा कालखंड जगासमोर आणणे होय. ही काळाची गरज आहे. म्हणून त्यांचे काम म्हणजे वडिलांप्रती असलेले प्रेम अर्थात वडिलांचा कृतज्ञतापूर्वक गौरव असेच म्हणावे लागेल.ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, जयशंकर दानवे म्हणजे सहकलाकारांना सांभाळून घेणारे, फणसासारखे वरून काट्यासारखे आणि आतून गोड, रसाळ गराचे असे कलावंतांचे दैवत होते.अध्यक्षस्थानावरून बोलताना जाधव म्हणाले, दानवेकाकांच्या खलनायकाचे अनुकरण केल्याशिवाय मराठी सिनेमा आजही पूर्ण होत नाही. जयश्री दानवे यांनी स्वागत, तर राजवर्धन दानवे यांनी आभार मानले.