जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या बसस्थानकासाठी आणखी एक कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी मंजूर झाल्यामुळे शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे. बसस्थानकाची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी हा निधी मंजूर झाला आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील हे बसस्थानक सुसज्ज व अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जयसिंगपूर बसस्थानकासाठी कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने एक कोटीचा निधी मिळाला. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर नवीन बसस्थानक बांधकामाला अखेर मुहूर्त सापडला. सध्या बसस्थानक इमारतीचा स्लॅब टाकण्यात आला आहे. बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या उजव्या बाजूला नव्याने बसस्थानक बांधण्यात येत आहे. हिरकणी कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष, पाच फलाट, दुकानगाळे बांधकामासाठी एक कोटीचा निधी अपेक्षित असला तरी बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता होती. तीन महिन्यांपूर्वी परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब हे जयसिंगपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बसस्थानक अद्ययावत असे उभारण्यासाठी आणखी दोन कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, मंगळवारी मुंबई येथे परिवहन मंत्री परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जयसिंगपूर बसस्थानकाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे सुसज्ज व अद्ययावत असे बसस्थानक उभारले जाणार असले तरी आणखी निधीची आवश्यकता भासणार आहे.
चौकट - वाहतुकीची कोंडी दूर करा, सध्या बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसमुळे क्रांती चौकात वाहतुकीची वारंवार कोंडी होते. त्यामुळे परिवहन विभागाने ये-जा करणाऱ्या बसेसचे नियोजन करून क्रांती चौकातील वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे. कोट - मंत्री डॉ. यड्रावकर यांच्या प्रयत्नाने परिवहन महामंडळाकडून मिळालेल्या या निधीमुळे बसस्थानकाची दुरुस्ती व सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याठिकाणी यात्री निवास बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संजय पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष
फोटो - १००२२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे नूतन बसस्थानक इमारतीचे बांधकाम सुरू आहे.