संतोष बामणे--जयसिंगपूर -शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांची मोठी डोकेदुखी वाढली असून, या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अवजड वाहतुकीबाबत पालिका व पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणेने कानावर हात ठेवले आहेत. सांगली-कोल्हापूर महामार्गाला पर्यायी बायपास रस्ता असतानाही शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातून अवजड वाहनांना बंदी केलेली असताना सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. शहरातील मुख्य सांगली-कोल्हापूर मार्ग अपुरा असून ओव्हरलोड वाहनांची ये-जा सातत्याने होत असते. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. अशा वाहनांमुळे नेहमी छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. सांगली-कोल्हापूर मार्गावरून अवजड वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून चौंडेश्वरी फाटा केपीटीवरून उदगाव, असा मार्ग दिलेला असतानाही अवजड वाहने व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची शहरातूनच वाहतूक कशी होते, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.शहरात सांगली-कोल्हापूर महामार्गालगतच बसस्थानक असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जयसिंगपूर बसस्थानकातून सुमारे दररोज १६००हून अधिक बसेस ये-जा करीत असतात. तसेच शिरोळ तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून जयसिंगपूरची ओळख आहे. त्यामुळे परिसरातील २० ते २५ गावांतील नागरिकांची वर्दळ या ठिकाणी असल्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. यातच सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीला धोका निर्माण होत आहे. अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरून वाहतूक सक्ती केली असूनही शहरातूनच अवजड वाहनांची वाहतूक सर्रास होत असल्यामुळे अशा वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात अवजड वाहनांना मज्जाव केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. यासाठी स्थानिक पोलीस व पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.वाहनचालकांना पोलिसांनी शिस्त लावण्याची गरज आहे. चारचाकी वाहने रस्त्याजवळ कोठेही उभी केली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. बेशिस्त पार्किंगमुळे दोन वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही उद्भवतात. पोलिसांकडून थातूर-मातूर कारवाई होत असल्यामुळे पुन्हा ‘जैसे थै’ परिस्थिती निर्माण होते. यावर सक्त कारवाईची गरज आहे.
जयसिंगपूर शहराला अवजड वाहनांचा भार
By admin | Published: December 03, 2015 9:36 PM