जयसिंगपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील शहरातील गर्दी वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘अत्यावश्यक सेवे’चे कारण सांगून अनेक लोक रस्त्यावरच दिसत आहेत. त्याचबरोबर विनामास्क फिरणाºयांची संख्या वाढली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा हतबल झाली आहे.
गर्दी कमी करा, कोरोनाची साखळी तोडा, अशी भूमिका घेऊन सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, या लॉकडाऊनचा परिणाम कमी प्रमाणात होत आहे. या ना त्या कारणाने लोक रस्त्यावर दिसत आहेत. रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून समज देण्यात आली आहे. शासकीय कोरोना सेंटरमधील बेड फुल्ल होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढत गेली तर बेड कमी पडतील, अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. प्रशासन पातळीवर साधनसामग्री उपलब्ध होईल. मात्र त्यावर काम करणारी यंत्रणा कमी पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनीच शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.