जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेची येणारी पंचवार्षिक निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जयसिंगपूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ अध्यक्षांची बैठक पक्षाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा सूर आवळला. या बैठकीत नगरपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून मिलिंद भिडे यांची निवड करण्यात आली. बुथ अध्यक्षांच्या समवेत प्रत्येक प्रभागात संपर्क अभियान सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील वाटचाल करण्याबाबतही निर्णय झाला. बैठकीस विठ्ठल पाटील, भगवान काटे, धोंडिराम जावळे, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, अॅड. सोनाली मगदूम, राजेंद्र दाईंगडे, संतोष जाधव, पंकज गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट - सत्ताधाऱ्यांमुळेच जनतेच्या अपेक्षा फोल :
पालिकेच्या गत निवडणुकीत परिवर्तन पाहिजे म्हणून जनतेने आमच्या ताराराणी आघाडीला कौल दिला व नगराध्यक्ष व आघाडीचे नऊ नगरसेवकही निवडून दिले. पण, नगराध्यक्षांना सत्ताधाऱ्यांनी काम करू दिले नसल्यामुळे जनतेच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे यावेळी पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा निर्णय बैठकीत घेतला असल्याची माहिती यळगुडकर यांनी दिली.