जयसिंगपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कडक नियम अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडूनही तीन ठिकाणी लसीकरण केले जात आहे, तर विनाकारण फिरणाऱ्यांबरोबरच फळे, भाजी विक्रेत्यांची रॅपिड अॅन्टिजेन तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचली आहे. दररोज दहा ते पंधरा नागरिक बाधित होत आहेत. पालिका प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, उपनगरांतील काही व्यावसायिक उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शहरातील नववी ते तेरावी गल्ली परिसरात दैनंदिन बाजार भरत असल्याने गर्दी होत होती. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने हा परिसर बॅरिकेट्स लावून सीलबंद केला आहे. फिरून भाजी विक्री करण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या असून त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांचा वॉच आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांबरोबरच भाजी व फळे विक्रेत्यांची रॅपिड अॅन्टिजेन तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्या नऊपैकी एक तरुण पॉझिटिव्ह निघाला, तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी महात्मा फुले भाजी मंडईत साठ भाजी विक्रेत्यांची अॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, विनाकारण फिरणाऱ्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी उपाययोजना राबवत आहेत. याला कर्मचाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण यंत्रणा देखील चांगल्या प्रकारे सुरू आहे.