जयसिंगपूर : नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाचा कार्यकाल ३ जानेवारीला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून, येत्या ६ जानेवारीला स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
येथील पालिकेवर नगराध्यक्ष ताराराणी आघाडीचा, तर बहुमत राजर्षी शाहू विकास आघाडीकडे आहे. त्यामुळे स्थायी समिती व विषय समित्यांवर शाहू आघाडीचेच वर्चस्व आहे. ताराराणी आघाडीतील अपवादात्मक सदस्य वगळता अन्य सदस्य व शाहू आघाडीचे सदस्य यांच्यात सहमतीचे राजकारण सुरू आहे. दिवाळीनंतर नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विषय समित्यांच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. हाच फॉर्म्युला नगरपालिका निवडणुकीत राबविला जाणार का याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. बुधवारी (दि. ६) सकाळी अकरा वाजता तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विषय सभेद्वारे समिती व विषय समित्यांच्या निवडी होणार आहेत. येत्या वर्षभरात नगरपालिका निवडणूक असल्यामुळे सभापतीपदी आपल्यालाच संधी मिळावी, यासाठी इच्छुक नगरसेवकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.
चौकट - यांना मिळाली होती संधी
‘शिक्षण समिती’ सभापतिपदी संजय पाटील-यड्रावकर, ‘पाणीपुरवठा’ असलम फरास, ‘बांधकाम’ महेश कलकुटगी, ‘नियोजन’ स्वरूपा पाटील-यड्रावकर, आरोग्य दीपा झेले, तर महिला बालकल्याण सुलक्षणा कांबळे यांची, तर उपसभापतिपदी रेखा देशमुख यांना गतवेळी संधी देण्यात आली होती.