कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णी अद्याप कुरुंदवाड पुलाला तुंबलेलीच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. त्यामुळे जलपर्णी हटवायची कशी, असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला असून, पुलाला धोका निर्माण झाला आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणामुळे जलपर्णीचे संकट निर्माण होते. हिवाळ्यात तयार होऊन जलपर्णी उन्हाळ्यात संपूर्ण नदीपात्राला व्यापून टाकते.
पावसाळ्यातील पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यानंतर नदीला जलपर्णीपासून मुक्ती मिळते. यंदा मान्सूनने सुरुवातीलाच झोडपून काढल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली. पाण्याबरोबर कोल्हापूरपासून पात्रात वाढलेली जलपर्णी वाहून गेली. मात्र वाहत आलेली जलपर्णी कुरुंदवाड पुलाला तटल्याने पुलापासून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत सात ते आठ फूट उंचीचा जलपर्णीचा थर रचला आहे. पाण्याचा प्रवाह आणि जलपर्णीचा दाब यामुळे या परिसरातील लोखंडी विद्युत पोलही भुईसपाट झाले आहेत. त्यामुळे पुलालाही धोका निर्माण झाल्याने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी शनिवारी पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन जेसीबी मशीनच्या साहाय्याने जलपर्णी हटविण्याची मोहीम राबविली. मात्र सात ते आठ फूट जाडीची घट्ट विणलेली जलपर्णी जेसीबी मशीनलाही काढणे शक्य झाली नाही. त्यामुळे ती हटविण्याची मोहीम थांबविण्यात आली आहे. पुलाचे संरक्षित कठडे तोडून काढल्याने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. मात्र जलपर्णी आणि पाण्याचा प्रवाह पुलाला प्रचंड दाब देत असून, पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलपर्णी हटविणे गरजेचे आहे.
फोटो - २१०६२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - पंचगंगा नदीवरील कुरुंदवाड-शिरढोण पुलाला जलपर्णी तटली आहे.