भरत बुटाले । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आज ती झाडे डौलाने मुळं घट्ट करून उभी आहेत. सुमारे २० ते २५ फूट उंच असतील. अनेकदृष्टीने फायदेशीर ठरणारी झाडे पर्यावरणरक्षणाचेही कार्य करीत आहेत. टाकाळा परिसरात राहणाऱ्या जनार्दन भोसले यांनी १९९९ मध्ये पंढरपुरात विठ्ठलचरणी वृक्षारोपणाचा संकल्प केला होता. त्यावेळेपासून आजपर्यंत सुमारे चार ते पाच हजार झाडे त्यांनी लावून जास्तीत जास्त झाडांचे संगोपन केले आहे. प्रवासी वाहतूक व्यावसायिक भोसले हे पंढरपूर भागात दर्शनाला गेल्यावर तेथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवाला आले. तिथेच त्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला आणि टाकाळा परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली. स्वखर्चातून झाडे आणायची, योग्य जागा पाहून तिथं ती लावायची, त्याच्या खत-पाण्याची व्यवस्था करायची आणि शक्य तेवढे त्यांचे संगोपन करायचे, असा त्यांचा हा उपक्रम. अल्प शिक्षण आणि अगदी सामान्य परिस्थिती असूनसुद्धा त्यांनी १७ वर्षांपूर्वी केलेला हा संकल्प अनेक ठिकाणी लावलेल्या वृक्षराजीच्या रूपाने फळास आला आहे.त्यांनी आजपर्यंत रेन ट्री, कॅशिओ, गुलमोहर, लिंब, आंबा, फणस, करंजी, फॅटोडिया, कदंबा, डालचिनी, चिकू, नारळ या झाडांबरोबर औषधी झाडेही लावलेली आहेत. झाडांना ट्री गार्ड लावून त्याचे संरक्षण करणाऱ्या जनार्दन भोसले यांना त्यांच्या मित्रपरिवाराने ‘वृक्षमित्र’ उपाधी बहाल केली आहे. टाकाळा, पांजरपोळ, उजळाईवाडी, कागल पंचतारांकित एमआयडीसी, निपाणी बसस्टँड, आदी अनेक परिसरात त्यांनी लावलेली झाडे डौलाने उभी आहेत. त्यांच्या या संकल्पाला अनेकांनी हातभार लावला आहे. वैयक्तिक, संस्था तसेच जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते झालेला गौरव हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.प्रत्येकाने एकतरी झाड लावावे आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे जपावे, असे नेहमीच वाटते. याची फळे पुढच्या पिढीला नक्कीच मिळतील. नाही तर पुढची पिढी, निसर्ग आपल्याला कदापिही माफ करणार नाही. - जनार्दन भोसले, वृक्षमित्र, टाकाळा, कोल्हापूर.कोल्हापुरातील टाकाळा येथील विद्यालंकार क्लासेसच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, जनार्दन भोसले, रोहन शिर्के, डॉ. सुरज पोवार, रवी चव्हाण, आदी उपस्थित होते.
जनार्दन भोसलेंनी केली पाच हजार वृक्षलागवड
By admin | Published: June 13, 2017 12:28 AM