कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा जनसुराज्य पक्षाचा निर्णय आज, गुरुवारी घेतला जाणार आहे. याबाबत बुधवारी सायंकाळी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष विनय कोरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली असून, ‘जनसुराज्य’चे वजन सतेज पाटील यांच्या पारड्यातच टाकण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन मातब्बर उमेदवारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याने ईर्षा टोकाला पोहोचली आहे. त्यामुळे पाठिंब्यासाठी चढाओढ सुरू आहे. कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांचे काम सुरू केले आहे; पण राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाने अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत. परवा आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रा. जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर माजी मंत्री विनय कोरे यांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली व कोरे यांनी थेट नागपूर गाठल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विनय कोरे नेमकी कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विनय कोरे हे बुधवारी दुपारी कोल्हापुरात आले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. सायंकाळी वारणानगर येथील कोरे यांच्या निवासस्थानी प्रा. जयंत पाटील, विजयसिंह जाधव यांच्यासह पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाली. यामध्ये सर्व राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. पाठिंबा कोणाला द्यावा, याविषयी विचारविनिमय करण्यात आला. तोपर्यंत सतेज पाटील बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्याशी काही वेळ चर्चा झाली. पाठिंब्याचा निर्णय आज, गुरुवारी जाहीर करण्याचे ठरले. एकंदरीत जनसुराज्य पक्षांतर्गत राजकीय हालचाली पाहता सतेज पाटील यांनाच त्यांचा पाठिंबा मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. इच्छुकांच्या ‘लॉबिंग’साठी कोल्हापूरकर इचलकरंजीतइचलकरंजी : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी वाटाघाटी करण्याकरिता कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते बुधवारी दिवसभर कार्यरत होते. नगरपालिकेच्या इमारतीसह काही प्रमुख नेते व नगरसेवकांकडे त्यांचा वावर होता.निवडणुकीसाठी उभे असलेले आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील या दोघांसाठीही मते मिळविण्यासाठी विविध पक्षांचे नेते, पक्षप्रतोद व काही प्रमुख नगरसेवक यांच्याकडे कोल्हापूरचे नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते गाटीभेठी घेत होते. अशा वाटाघाटी, चर्चा दिवसभर संबंधितांच्या निवासस्थानी आणि काही प्रमुखांच्या कार्यालयात सुरू होत्या.पालिकेतील विविध विषय समित्यांची निवडणूक १९ डिसेंबरला होत असल्याने समित्यांवर आपापल्या नगरसेवकांची नावे देण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम पक्षप्रतोद करीत होते. त्यामुळे या मंडळींचा वावर नगरपालिका कार्यालयातही होता. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीवरकोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुसंख्य नगरसेवक सहलींवर रवाना झाले. सहलीवर गेलेले हे नगरसेवक आता २६ डिसेंबरला कोल्हापुरात परतणार आहेत. कोल्हापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार महादेवराव महाडिक व कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होत असल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. मर्यादित मतदार असल्याने एक-एक मताला बहुमूल्य किंमत आली आहे. त्यामुळे एक-एक मताची जोडणी सुरू असून त्यासाठी उमेदवारांकडून विनवणी सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण ८१ नगरसेवक हे मतदार आहेत. त्यांपैकी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे ४४, तर भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. निवडणुकीचे मतदान गुप्त पद्धतीने असल्याने कोणताही धोका पत्करायचा नाही, असा उमेदवारांचा आग्रह आहे. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बुधवारी सकाळी सहलींवर नेण्यात आले. सर्व नगरसेवकांना ड्रीमवर्ल्ड येथे येण्यास सांगण्यात आले होते. तेथून खास वाहनाने सर्वांना सहलींवर नेण्यात आले. महिला नगरसेवकांसोबत त्यांच्या पतींनाही नेण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी महापालिकेत सामसूम दिसली. (प्रतिनिधी)
‘जनसुराज्य’चे पाठबळ सतेजना!
By admin | Published: December 17, 2015 1:33 AM