राम मगदूम
गडहिंग्लज : देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणा-यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढणा-या शक्तींची संख्या वाढवा, असे आवाहन जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केले. महागाई, गॅस व वीज दरवाढीच्या निषेधार्थ जनता दलातर्फे गडहिंग्लज प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील म्हणाले, हे सरकार धोकेबाजांचे आहे. सत्तेत नसताना महागाईविरोधी आंदोलने करणा-या भाजपाला सत्ता मिळाल्यावर त्याचा विसर पडला आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून गॅस, वीज, इंधन सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे.माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, महागाईमध्ये भारताचा जगात १२ वा क्रमांक लागतो. देशातील गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत चालली आहे. सत्ताधाºयांना फक्त सत्तेशी पडले आहे. त्यामुळे देश अधोगतीकडे चालला आहे.शहरातील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. प्रमुख मार्गावरून फिरून आल्यानंतर प्रांतकचेरीसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी प्राचार्य जे. बी. बार्देस्कर, शिवानंद घस्ती, शरद पाडळकर, काशिनाथ देवगोंडा, दत्तात्रय मगदूम यांची भाषणे झाली.मोर्चात तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, उदय कदम, मधुकर पाटील, महांतेश पाटील, बाळकृष्ण परीट, शशीकांत चोथे, हिंदूराव नौकुडकर, अजित शिंदे, मनोज कदम, भिमराव पाटील, महेश कोरी, नितीन देसाई, रमेश पाटील, मोहन भैसकर, सुनिता पाटील, नाज खलिफा, शकुंतला हातरोटे, शशीकला पाटील, आदींसह नागरिक सहभागी झाले होते.अॅड. शिंदे म्हणाले..!
- शहराच्या विकास आराखड्यात कचरा डेपो आणि सांडपाणी प्रकल्पांसाठी हिरण्यकेशीच्या काठावरील जमिनींवर आरक्षणे टाकली आहेत. पावसाळा आणि पूरपरिस्थितीत तेथील सर्व घाण थेट नदीत मिसळणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प त्याठिकाणी होवू देणार नाही.
- लोकशाहीमार्गाने निवडणुका होतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे हुकूमशाहीकडे चाललेल्या सत्ताधा-यांना भय वाटले पाहिजे असे जनशक्तीचे संघटन निर्माण करायला हवे.