- राम मगदूम
खरीपाचा हंगाम वाया गेल्यामुळे गडहिंग्लज दुष्काळी तालुका जाहीर करा, सोयाबीनला प्रतिक्विंट १० हजार रूपये आणि गेल्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ४०० रूपये फरक मिळावा, अशी मागणी जनता दलातर्फे मोर्चाद्वारे करण्यात आली. ज्येष्ठ नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे जनतेच्या विविध प्रश्नावर विराट मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी त्यांचा जनसंघर्षाचा वसा कृतीतून जपला. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
लक्ष्मी चौकापासून सुरू झालेला मोर्चा प्रांतकचेरीवर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर प्रांताधिका-यांना निवेदन देण्यात आले. स्वाती कोरी म्हणाल्या, शिंदेंनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित, महिला, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या भल्यासाठी रस्त्यावरची लढाई केली. त्यांच्यामुळेच अरळगुंडी, हिटणी, हेब्बाळ, दुंडगे येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन झाले. गडहिंग्लज कारखाना व नगरपालिकेतील कामगारांना न्याय मिळाला.
बाबासाहेब नदाफ म्हणाले, केंद्र आणि राज्यातील सरकार भांडलवदार आणि धर्मवाद्यांचे राखणदार आहे. जाती-धर्माच्या नावावर सत्ता भोगण्याचा त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी शिंदेंच्या विचाराचीच गरज आहे. यावेळी तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, शंकर रणदिवे, बापूसाहेब म्हेत्री, शिवाजी होडगे, मधुकर मुसळे, शशीकांत मोहिते, शरद पडळकर, नीळकंठ कुराडे, शिवानंद घस्ती यांचीही भाषणे झाली. मोर्चात श्रीपती कदम, संभाजी नाईक, शिवाजी काकडे, हिंदूराव नौकुडकर, बसवराज खणगावे, नितीन देसाई, महेश कोरी, राजू खबाले, आनंदा सावंत, रामगोंडा पाटील, विश्वजीत सावंत, मालतेश पाटील, प्रियांका यादव आदींचा सहभाग होता.
कुटुंबियांचाही सहभागमोर्चात विजयराव शिंदे, रचना शिंदे, सुनिल शिंदे, अजित शिंदे, आप्पासाहेब पाटील, अनिता पाटील, स्मिता कोरी, मिलींद कोरी, प्रतीक कोरी, प्राची कोरी सहभागी झाले होते.
विचाराची कावड!नानांनी आयुष्यभर दीनदुबळ्यांसाठी संघर्ष केला. त्यांची काळजी, चिंता, वसा, विचार, जबाबदारी टाळणार नाही. त्यांच्या विचारांची कावड प्राणपणाने वाहिन. तुमच्या इच्छा, अपेक्षा, विश्वासाला कदापिही तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही स्वाती कोरी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.
मोर्चाच्या मागण्या२० पटाखालील शाळा बंद करू नका, कृषीउपसा यंत्रावर जलमापकाची सक्ती नको, संकेश्वर-बांदा महामार्ग बाधितांना योग्य भरपाई द्या, अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत सामावून घ्या, गडहिंग्लज कारखान्याच्या सेवेतील व सेवानिवृत्त कामगारांची थकित देणी-पगार द्या, शेंद्री एमआयडीसीत मोठा प्रकल्प सुरू करा, झोपडपट्टीतील बेघरांची घरे नियमित करा.