अक्षय पोवार ।शहापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील पाच लाख ९३ हजार महिलांच्या जनधन खात्यावर ५०० रुपयांप्रमाणे मदत दिली आहे. परिणामी अनेक कुटुंबांतील महिला लाभ पाहून आता बॅँकांसमोर खाते उघडण्यासाठी गर्दी करत आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर खरेदीसाठी इचलकरंजीतील आठ हजार ५५६ नागरिकांच्या बॅँक खात्यावर रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने सर्वांचे काम बंद पडले. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या बॅँक खात्यावर रक्कम व गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले आहे.जनधन खात्यांतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा ५०० रुपये जमा होत आहेत. हे पैसे तीन महिने जमा होणार असून, दोन महिन्यांचा लाभ मिळाला आहे. तसेच उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी तीन महिन्यांकरिता नागरिकांच्या बॅँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली आहे. या दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती समजताच दोन्ही योजनेत नावनोंदणीसाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामध्ये काही एजंटांकडून लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले जात आहेत.
मोबाईल नंबर लिंक नसल्याने गोंधळशहरातील गॅस कंपनीमार्फत नागरिकांना आॅनलाईन नंबर लावण्यास सांगितले जात आहे. परंतु अनेक नागरिकांचे मोबाईल नंबर लिंक नसल्याने गोंधळ उडत आहे. यावेळी लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यानंतर आॅनलाईन नंबर लावल्यानंतर बँक खात्यावर शासनाचे पैसे जमा झाल्यावरच नागरिकांना गॅस सिलिंडर देण्यात येतो.
अनेक बॅँकांसमोर रांगाजिल्ह्यामध्ये लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणच्या राष्टÑीयीकृत बँकांच्या बाहेर नागरिकांची गर्दी होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी २८ आॅगस्ट २०१४ ते २४ मार्च २०२० पर्यंत बॅँकेत महिलांना खाते काढण्यास सांगितले. त्या नियमानुसार महिलांना वित्तीय संस्थांमार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभ मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गैरसमज पसरविले जात आहेत; परंतु आता काढलेल्या खात्यांना याचा लाभ मिळणार नाही.- राहुल माने, अग्रणी जिल्हा प्रबंधक