कोल्हापूर : वीरशैव जंगम समाजाचे प्रलंबित प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी वीरशैव जंगम समाज मेळाव्यात दिली. अक्कमहादेवी मंडप येथे रविवारी वीरशैव जंगम समाज मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, नूलचे वीर गोत्रीय उपाचार्यरत्न ष. ब्र. १०८, चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, वाईचे नंदीगोत्रीय श्री ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य, नंदीगोत्रीय श्री ष. ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य वाळवा, शिवभक्त प. पू. श्री आशिषानंद महाराज धारूर यांची प्रमुख उपस्थिती होती.खासदार महाडिक म्हणाले, माझे चुलत बंधू हे आमदार आहेत, तर मी खासदार आहे. त्यामुळे तुमच्या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यात व केंद्रात आम्ही दोघे प्रयत्नशील राहीन. सभागृहाबाबत जो प्रश्न आहे, त्यासाठी तुम्ही माझी दोन दिवसांनी भेट घ्या. तुमच्या प्रलंबित प्रश्नाबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी विचारविनिमय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, जंगम समाजाला अनेक वर्षांपासून पूजा-अर्चा करण्याचा मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये गडकिल्ल्यांवरील मंदिरांत हा समाज पूजा-अर्चा करीत होता. आजही गावागावांत याच समाज बांधवांकडून पूजा केली जाते. या समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील. कोल्हापुरात वीरशैव जंगम समाजाच्या सभागृहासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये देणार आहे. चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले, सर्व समाजबांधवांनी संघटित झाले पाहिजे. समाजात जागृती झाल्याशिवाज समाजाचा विकास होणार नाही. यासाठी संघटित व्हा. मेळाव्याचे आयोजन ॐ श्री पंचाक्षर माहेश्वर (जंगम) पौरोहित्य मंडळ, कोल्हापूर जिल्हा जंगम पौरोहित्य मंडळ, कोल्हापूर व ॐ श्री शिव आराधना जंगम पौरोहित्य मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह माहेश्वर मूर्ती पांडुरंग जंगम, गंगाधर हिरेमठ, महेश जंगम, प्रशांत जंगम, प्रकाश जंगम, रेवणनाथ जंगम, सुरेश स्वामी, राजेंद्र जंगम, रामचंद्र जंगम, संतोष जंगम, महेश जंगम, विवेकानंद स्वामी, विश्वनाथ जंगम, संकेश्वरचे अजित स्वामी, अमर पाटील, आदी उपस्थित होते. प्रकाश स्वामी यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
जंगम समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडणार
By admin | Published: March 23, 2015 12:03 AM