कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. जानकी रंगराजन यांच्या भाव, राग, ताल यांच्या लयबद्ध सादरीकरणावर आधारित ‘संविक्षणा’ नृत्याविष्काराने रसिकांवर मोहिनी घातली. भारतीय कलाक्षेत्रात एक वेगळे ध्येय घेऊन काम करणाऱ्या गार्डियन कॉर्पोरेशनच्या ‘नृत्ययात्री’ या संस्थेतर्फे शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गार्डियन डेव्हलपर्सचे संचालक मेघना साबडे, उदय जाधव, गार्डियन डेव्हलपर्सच्या उर्वरित महाराष्ट्रचे सेल्स हेड कृष्णा दिवटे, आदी उपस्थित होते. डॉ. रंगराजन यांनी तमिळनाडूच्या पारंपरिक लॉर्ड मुरगा यांच्या कथेवर आधारित ‘वर्णम’ हे नृत्य सादर केले. गाई राखणाऱ्या कृष्णाच्या प्रेमात असलेल्या भावविभोर राधेच्या मनातील भाव त्यांनी आपल्या नृत्याविष्काराद्वारे सादर केले. त्यानंतर त्यांनी ‘संविक्षणा’ हा नृत्यप्रकार सादर केला. ज्यामध्ये एका नायिकेचे तिच्या परमेश्वरावर असलेले प्रेम या प्रकारातून त्यांनी प्रभावीपणे सादर केले. नृत्य आणि अभिनयाचे महत्त्वपूर्ण अंग असलेल्या या कलाप्रकाराला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. दोन तासांहून अधिकच्या मैफलीत लयबद्ध पदन्यास, पताका, त्रिपताका, अर्धपताका, सूची, अर्धसूची, मृग, पुष्प, मत्स्य, गोमुख, पद्म, आदी हस्तमुद्रांनी त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. कलेच्या प्रवासात अनुभव, विचार यांची देवाणघेवाण झाल्याने कलाकार समृद्ध होत जातो; त्यामुळे ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे होते. ‘नृत्ययात्री’तर्फे गेल्या पाच वर्षांत भारतीय नृत्यकलेच्या संपन्न व वैभवशाली परंपरेत भर घातली आहे. नव्या कलाकारांना दिग्गज मंडळींचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा संस्थेचा हेतू आहे, असे मत साबडे यांनी मनोगतात व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगना डॉ. जानकी रंगराजन यांचा नृत्याविष्कार कोल्हापुरात पहिल्यांदाच झाल्याने रसिकांनी गर्दी केली होती. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
जानकी यांच्या भरतनाट्यमची मोहिनी
By admin | Published: November 06, 2016 12:10 AM