कोल्हापूर : मराठा मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी गुरुवारी (दि. १३) कोल्हापूर शहरात दुचाकी रॅली काढण्याचा निर्धार सकल मराठा रणरागिणींनी केला. याबाबत जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे शनिवारी बैठक झाली. यामध्ये रॅलीबाबत आचारसंहितेचे पालन करीत धडकी भरेल अशी रॅली काढण्याचा निश्चय यावेळी केला. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ताराराणी चौकातून रॅलीस सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे दसरा चौकात विसर्जित केली जाणार आहे. रॅलीच्या माध्यमातून १५ आॅक्टोबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. यावेळी विविध रणरागिणींनी मनोगत व्यक्त करीत शिस्तबद्ध रॅलीसाठी काय आचारसंहिता असणार याची माहिती दिली. दुचाकीवरून रॅलीत सहभागी होताना कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका, येताना पाण्याची बाटली, स्वत:चा डबा घेऊन यावे, असे आवाहन करीत वयोवृद्ध महिलांनी रॅलीत सहभागी होण्यापेक्षा दसरा चौकातील सांगता समारंभात उपस्थित राहावे, असे अरुंधती महाडिक यांनी सांगितले. १५ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपणाला जनजागृती करायची आहे, त्या दृष्टीने रॅलीतून प्रबोधन होणे गरजेचे आहे, अशी सूचना करीत येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक रणरागिणीने किमान ५० दुचाकी आणाव्यात, असे आवाहन प्रतिमा पाटील यांनी केले. रॅलीतून जाताना केवळ गाड्यांचेच आवाज येतील, याची दक्षता सर्वांनी घ्या. सेल्फीचा मोह कोणीही बाळगू नका, असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले. मराठा समाजाला आतापर्यंत झालेला त्रास काय आहे, याची जाणीव आता सर्वच घटकाला झाल्याने १५ आॅक्टोबरचा मोर्चा ‘भूतो न भविष्यति’ असाच होईल, असा विश्वास महापौर अश्विनी रामाणे यांनी व्यक्त केला. रॅली नियोजनबद्ध केली तर अधिक चांगले होईल, यासाठी पुन्हा एकदा बैठक बोलावण्याची सूचना माजी महापौर सई खराडे यांनी केली. संयोगिताराजे छत्रपती, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, रेखा आवळे, स्नेहल इनामदार, आदी उपस्थित होते.गाड्यांचा वेग ‘३०’ आणि नो स्कार्फ रॅलीमधील गाड्यांचा वेग प्रति तास २० ते ३० किलोमीटर असेल. त्यापेक्षा अधिक वेगाने गाडी पळवायची नाही, त्याचबरोबर तोंडाला स्कार्फ बांधायचा नाही आणि पांढरी साडी अथवा ड्रेस परिधान करूनच रॅलीत सहभागी होण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
रणरागिणींची गुरुवारी जनजागृती रॅली
By admin | Published: October 09, 2016 1:29 AM