राजाराम कांबळेमलकापूर : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात जनसुराज्यशक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी सत्यजित पाटील-सरूडकर यांचा ३६ हजार ०५३ मतांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघावर आपले नेतृत्व सिद्ध केले. सत्यजित पाटील यांना लोकसभा व विधानसभेला दोन वेळा पराभव पत्करावा लागल्यामुळे सत्यजित पाटील गटाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. शाहूवाडी पन्हाळ्याच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येत असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात पारंपरिक लढत झाली. लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी दिलेली निकराची लढत आणि त्यांचा झालेला थोडक्यात पराभव यामुळे विधानसभेला नेमके काय होणार, याची चर्चा सुरू झाली होती. लोकसभेच्या रणांगणात आमदार विनय कोरे यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी केलेले प्रयत्न आणि लावलेल्या जोडण्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वी झाल्याच दिसते.
आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात केलेली विकासकामे व लावलेल्या जोडण्या यांमुळेच त्यांचा विजय सोपा झाला. शाहूवाडी तालुक्यातील मतदारापर्यंत रात्रीत पोहोच झालेली रसद व लाडक्या बहिणींची सहानुभूती, मुंबईतील आठ हजारांहून अधिक गावी मतदानासाठी आणलेले मतदार यांचा लाभ विनय कोरे यांना विजयापर्यंत घेऊन गेला. या निकालामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपलिकेच्या निवडणुकीत ‘जनसुराज्य’ला ताकद मिळणार आहे.सत्यजित पाटील यांच्या गटाकडे दोन नंबर फळीच्या कार्यकर्त्यांची वानवा दिसून आली. सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अतिआत्मविश्वासामुळे कार्यकर्ते हवेत राहिले, याचा फायदा विनय कोरे यांनी उचलला. विनय कोरे यांच्याकडे ‘गोकुळ’चे संचालक करणसिंग गायकवाड, अमर पाटील, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, बाबा लाड, रंगराव खोपडे, विजय बोरगे, एच. आर. जाधव, सरपंच रवींद्र जाधव ही टीम काम करीत होती; तर सत्यजित पाटील यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, जालिंदर पाटील, विजय खोत, पांडुरंग पाटील, भीमराव पाटील हे प्रचार यंत्रणा सांभाळत होते.
मतदारसंघात विनय कोरे यांनी अडीच वर्षांत १७०० कोटींची विकासकामे राबविली. सर्वांत जास्त निधी शाहूवाडी तालुक्यात दिल्यामुळे शाहूवाडीतील जनतेने कोरे यांच्या झोळीत भरभरून मते टाकली. महिन्याला पंधराशे रुपये मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींनी मतदान केले. दलित समाजाला बौद्धविहार बांधण्यासाठी विनय कोरे यांनी निधी दिल्यामुळे दलित समाजदेखील पाठीशी ठाम राहिला.विशाळगड, गजापूर, मलकापूर, उचत येथील मुस्लिम समाजानेही कोरे यांना मताधिक्य दिले. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात विनय कोरे यांना ६१ हजार ८३१ मते मिळालीत; तर सत्यजित पाटील ६२ हजार ९६२ मते मिळाली. हक्काच्या तालुक्यात सत्यजित पाटील यांना नाममात्र १०३१ मतांची आघाडी मिळाली. पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य पै. विजय बोरगे यांनी विनय कोरे यांना दिलेला पाठिंबा फायद्याचा ठरला.गटातटाची समीकरणे
शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांत गटातटाचे राजकारण चालते; त्यामुळे येथे पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व आहे. विनय कोरे यांनी पन्हाळ्यातून माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील व शाहूवाडीतून माजी आमदार संजयसिंह गायकवाड या दोन गटांची ताकद विनय कोरे यांच्याकडे राहिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला.शेतकरी संघटनेची ताकद दिसली नाही
शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. लोकसभेला त्यांना पंधरा हजार मते मिळाली होती. मात्र सत्यजित पाटील यांना शेतकरी संघटनेची ताकद मिळाली नाही, हे निकालावरून स्पष्ट होते.