लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२१ ही कट ऑफ डेट निश्चित केली आहे. त्यानुसार प्रारूप याद्या तयार करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शुक्रवारी काढले. या आदेशानुसार जिल्ह्यातील २०१ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
जिल्ह्यातील सुमारे चार हजार संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. कर्जमाफी, कोरोनामुळे टप्प्याटप्प्याने या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून त्यानुसार जिल्ह्यातील १००२ संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. या संस्थांच्या कट ऑफ डेट याबाबत न्यायालयापर्यंत वाद पोहोचला होता. मात्र, न्यायालयाने फेटाळून लावत ज्यांची प्रक्रिया सुरू होऊन जिथे थांबली तेथूनच प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून त्यासाठी प्राधिकरणाने कट ऑफ डेट निश्चित केली. त्यानुसार ३१ जानेवारी २०२१ ही कट ऑफ डेट धरून प्रारूप याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. व्यक्ती सभासदांसाठी ३१ जानेवारी २०१९, तर संस्था सभासदांसाठी ३१ जानेवारी २०१८ पर्यंतचे सभासद ग्राह्य मानून याद्या तयार केल्या जाणार आहेत.