लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथे जानेवारी २४ मध्ये होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक, देवल क्लबसह अन्य सामाजिक संस्थांचे प्रमुख असलेले व्ही. बी. पाटील यांची निवड करण्यात आली. शेकाप कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ मेघा पानसरे होत्या. यावेळी संयोजन समितीच्या वतीने पाटील यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी व्ही बी पाटील म्हणाले, जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड करून संयोजन समितीने माझा मोठा सन्मान केला आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही सांगाल ती जबाबदारी उचलायला तयार आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचे माझे सहकार्य राहील. कोल्हापूरच्या लौकिकाला साजेल असेच हे संमेलन आपण सर्वजण मिळून करू.
यावेळी नियोजनाची तपशिलाने चर्चा करण्यात आली.दोन दिवस होणारे हे साहित्य संमेलन शाहू स्मारक येथे घेण्याचा निर्णयही करण्यात आला. येत्या दोन दिवसात संमेलनाच्या अध्यक्ष व उद्घाटक याची निवड करण्यात येणार आहे. बैठकीच्या सुरवातीला कॉ संपत देसाई यांनी बैठकीची विषयपत्रिका मांडली. यावेळी कॉ चंद्रकांत यादव, डॉ मेघा पानसरे, डॉ मंजुश्री पवार, वसंतराव मुळीक, डॉ अरुण शिंदे, रुपेश पाटील यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. समारोप व आभार अंकुश कदम यांनी मांडले.