कागल : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यात रविवारी नेहमीच्या राजकीय ईर्षेने पण शांततेत १०० टक्के मतदान झाले. येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इमारतीत आठ मतदान केंद्रांवर मतदानाचे नियोजन केले होते. मतदारामध्ये एका कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा समावेश होता.
सकाळी नऊच्या सुमारास विरोधी आघाडीचे मतदार एकत्रितपणे शक्तिप्रदर्शन करीत मतदान केंद्रांवर आले; तर प्रत्युत्तरादाखल सत्ताधारी आघाडीचे मतदारही साडेदहाच्या सुमारास मतदान केंद्रांवर एकगठ्ठा आले. दुपारी बारा वाजता फक्त चार मतदार बाकी राहिले. यानंतर मतदान केंद्र ओस पडले. सर्व यंत्रणा दुपारी चार वाजेपर्यंत मतदारांची वाट पाहत थांबली होती. शेवटी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाने पीपीई किट घालून मतदान केले.
तालुक्यातील उमेदवार रणजितसिंह पाटील, अंबरीशसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ, संजय मंडलिक सकाळी सात वाजल्यापासून हजर होते. आठ वाजता माजी आमदार संजय घाटगे आले होते. माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही भेट दिली. साडेआठ वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक मतदानासाठी आले. त्यानंतर अलका शेती फाॅर्मवरून पिवळ्या टोप्या परिधान करून चालत येत असलेल्या मतदारांचे नेतृत्व केले; तर सत्ताधारी गटाचे मतदार पांढऱ्या टोप्या परिधान करून आले होते. त्यांच्यासोबत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, रणजितसिंह पाटील, अंबरीशसिंह घाटगे चालत केंद्रांवर आले. माजी संचालिका अरूंधती घाटगे, नवोदिता घाटगे, प्रवीणसिंह पाटील, भैया माने यांनीही मतदान केले.
घोषणाबाजी नाही....
मुश्रीफ-मंडलिक गटाचे मतदार वेगवेगळ्या ठिकाणांहून अलका शेती फार्मवर आले; तर संजय घाटगे, रणजितसिंह पाटील आणि समरजित घाटगे गटाचे मतदार एकत्र जमले; पण कोणीही घोषणाबाजी केली नाही. मतदाराबरोबर उत्साही कार्यकर्तेही आत जाऊ लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून शक्तिप्रदर्शनासाठी आलेल्यांना हाकलून लावले. मात्र या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. काही मतदार मात्र स्वतंत्रपणे मतदानासाठी आले होते.
एकूण मतदार ३८३
मतदान झाले
३८३
महिला मतदार : 89
पुरुष मतदार : २९४
लक्ष ठेवा.. बाबा डोळा मारतील
मंत्री मुश्रीफ आणि खासदार मंडलिक एकत्र मतदानासाठी आले तेव्हा त्यांची व संजयबाबा घाटगे यांची भेट झाली. अंबरीश, नवीद आणि वीरेंद्र मंडलिकही यावेळी सहभागी होते. हे दूर उभे असलेले रणजितसिंह पाटील पाहत होते. संजय घाटगे यांनी रणजितसिंह यांना बोलावून घेतले. तेव्हा मुश्रीफ यांनी ‘बोलवा बोलवा; उगीच चर्चेला कारण नको,’ अशी टिप्पणी केली; तर जाता-जाता मुश्रीफ म्हणाले ‘नवीद, वीरेंद्र, आपले मतदार येत आहेत. लक्ष ठेवा. आपल्या मतदारांना संजयबाबा डोळा मारतील हं...!’ यावर सगळेच हसू लागले.