कोल्हापूर : ‘प्रकाश जावडेकरांचा धिक्कार असो’, ‘भाजप सरकार, चले जाव’ अशा घोषणा देत आॅल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) रविवारी बिंदू चौकात ‘भीख मांगो’ आंदोलनाद्वारे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध केला.केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी शाळांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘एआयवायएफ’ आणि ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्यांनी ‘भीख मांगो’ आंदोलन केले. त्यांनी मंत्री जावडेकर यांचे छायाचित्र कटोऱ्यात ठेवून, छायाचित्रावर ‘भिकारी’ असे लिहून हे आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘प्रकाश जावडेकर राजीनामा द्या’, ‘निधी आमच्या हक्काचा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे म्हणाले, जनता सरकारला विविध कररूपाने पैसे देते. त्यातूनच सरकार जनतेला शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधा देते; त्यामुळे शिक्षणाच्या सुविधेसाठी शाळांच्या निधी मागणीला मंत्री जावडेकर यांनी ‘भीक मागणे’ म्हणणे चुकीचे आहे.या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव नामदेव गावडे, ‘एआयएसएफ’चे जिल्हा सचिव प्रशांत आंबी, आरती रेडेकर, धीरज कटारे, हरीश कांबळे, दिलदार मुजावर, शिवप्रसाद शेवाळे, अमोल पांढरे, राजवैभव कांबळे, अमोल देवडकर, अमित समुद्रे, आनंद सातपुते, कृष्णा पानसे, योगेश कसबे, शुभम कुंभार, महादेव शिंगे, आदी सहभागी झाले.जमलेले पैसेजावडेकरांना पाठविणारकेंद्रीय मंत्री जावडेकर यांनी ‘शाळांनी सरकारकडे कटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यावेत,’ अशा स्वरूपातील वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ आणि त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आमचे ‘भीख मांगो’ आंदोलन आहे. या आंदोलनातून जमलेले पैसे आम्ही मंत्री जावडेकर यांना धनादेशाद्वारे पाठविणार आहोत, असे गिरीश फोंडे यांनी सांगितले.