इचलकरंजी/हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून, २९ डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप. शुगर फॅक्टरीज्चे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली जवाहर साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे.सुधारित बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमानुसार पुनर्रचना झालेल्या कारखान्याच्या संचालक मंडळाची पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक झाली असून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या आज, शुक्रवारी शेवटच्या दिवशी निवडून द्यावयाच्या संख्येइतके उमेदवार शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.नवीन संचालकांमध्ये उत्पादक सभासद सर्वसाधारण गटातून कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे (दोघेही इचलकरंजी), आण्णासाहेब गोटखिंडे (यळगूड), अभयकुमार काश्मिरे (रुई), बसगोंडा पाटील-कुगे (चंदूर), जवाहर पाटील (अब्दुललाट), बाबासाहेब चौगुले (कुंभोज), बाबासाहेब नोरजे (कारदगा), अशोक नारे (बेडकिहाळ), डॉ. सुरगोंडा पाटील (सदलगा), आदगोंडा पाटील (हेरले), सुकुमार किनिंगे (बुबनाळ), नेमगोंडा पाटील (नांदणी) आणि धनपाल आलासे (कुरुंदवाड) असे चौदा, उत्पादक सभासद महिला गटातून कमल पाटील (सुळकूड) व वंदना कुंभोजे (गौरवाड) या दोघी, उत्पादक सभासद अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती गटातून भगवान कांबळे (चिपरी) आणि बिगर उत्पादक सभासद (संस्था सभासद) गटातून विलास गाताडे (इचलकरंजी) आणि पुंडलिक वार्इंगडे (हुपरी) हे दोघे असे एकूण १९ संचालक नवनिर्वाचित संचालक असतील. बहुराज्य सहकारी संस्था कायद्यानुसार २९ डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे.कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते; पण कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक मंडळाच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या असून, याही निवडणुकीने कारखान्याची परंपरा अधोरेखित केली आहे. इचलकरंजीच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर हातकणंगलेचे उपनिबंधक सुनील सिंगतकर आणि शिरोळचे सहायक निबंधक सुनील धायगुडे हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)
‘जवाहर’ची निवडणूक बिनविरोध
By admin | Published: December 27, 2014 12:29 AM