इचलकरंजी : हुपरी (ता.हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वरद-विनायक बोट क्लबला यांत्रिक बोट प्रदान करण्यात आली. शहरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत धडक मारली आहे. या क्लबच्या माध्यमातून इचलकरंजी रोइंग क्लबने हा नावलौकिक असाच उंचावत न्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बोट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
वरद-विनायक बोट क्लबने महापूर काळात सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला. भाट मास्तर यांच्यासोबत सहकार्याने अडचणींवर मात करत अनेकांचे प्राण वाचवले. या क्लबच्या माध्यमातून रोइंग या क्रीडा प्रकारासाठी अनेक खेळाडू तयार झाले. या क्लबकडे जवळपास ४० बोट असून, इतक्या मोठ्या प्रमाणात बोटी असणारे इचलकरंजी एकमात्र शहर असेल.
खेळाडूंनी इचलकरंजीचे नाव अधिकाधिक उंचवावे, यासाठी लागेल ती मदत दिली जाईल. राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूस एक लाख, रौप्यपदक ७५ हजार, तर कास्यपदक विजेत्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही आवाडे यांनी सांगितले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा आमदार आवाडे यांनी सत्कार केला. यावेळी प्रकाश दत्तवाडे, पै. अमृत भोसले, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, बाळासाहेब जांभळे, गणेश बरगाले, शशिकांत मोघे, संजय बेडक्याळे, आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
१३०७२०२१-आयसीएच-०४
जवाहर साखर कारखान्याच्या वतीने इचलकरंजी वरद-विनायक क्लबला यांत्रिक बोट प्रदान केल्यानंतर बोटीतून आमदार प्रकाश आवाडे यांनी सफर केली.