कोल्हापूर : राज्यातील कॉसमॉस बँकेच्या विविध शाखांतून हॅकर्सनी आॅनलाईनद्वारे ९४ कोटी रुपये काढले आहेत. त्यामध्ये कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी शाखेचाही समावेश आहे. येथील बँकेत चौकशी व तपास करण्यासाठी ‘एसआयटी’चे पथक शुक्रवारी कोल्हापुरात आले; परंतु बँकेला सुटी असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. आज, शनिवारी बँकेतील सर्व आॅनलाईन व्यवहारांची माहिती घेतली जाईल. तांत्रिक व अभ्यासपूर्वक तपास सुरू असल्याची माहिती पुणे सायबरच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांनी दिली.
कॉसमॉस बॅँकेचे सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी ९४ कोटी रुपये काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बॅँकेच्या प्रशासनाने पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापुरातील कॉसमॉस बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतूनही अशाच प्रकारे पैसे उचलले असल्याचे पत्र पुणे सायबर विभागाला प्राप्त झाले आहे. या कोट्यवधी रुपयांच्या आॅनलाईन फसवणुकीप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नियुक्त केले आहे.
कॉसमॉस बँकेच्या राज्यातील चार शाखांचा यामध्ये समावेश आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक व चार कर्मचाऱ्यांचे पथक शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले. मात्र बँकेला शासकीय सुटी असल्याने पथकाला चौकशी करता आली नाही. शनिवारी बँकेचे व्यवहार सुरू होतील. त्यानंतर पथकातील सायबर तज्ज्ञांकडून आॅनलाईन माहिती घेतली जाईल. बँकेच्या व्यवस्थापकासह, कॅशिअर व कर्मचाºयांचे जबाब घेतले जाणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट रोजी हॅकर्सनी बॅँकेवर सायबर हल्ला करून दोन तासांच्या कालावधीत २८ देशांतून ९४ कोटी रुपये काढले आहेत.अफवांवर विश्वास ठेवू नकाबॅँक खूप जुनी आहे. त्यावरील ग्राहकांचे व्यवहार सुरक्षित आहेत. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, गैरसमज करून घेऊ नये अथवा पसरवू नये. खातेदारांची रक्कम सुरक्षित आहे. घाबरू नका, व्यवहार सुरळीत ठेवा, अशी नोटीस लक्ष्मीपुरीतील बँकेच्या एटीएम केंद्रावर चिकटविली आहे.