कोल्हापूर : जवाहरनगर सिरतमोहल्ला परिसरात चार ठिकाणी घरफोडी झालेचे सोमवारी पहाटे उघडकीस आले. चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून कपाटातील बारा तोळे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे.जवाहरनगर सिरतमोहल्ला येथे ईर्शाद मेहबुब बेपारी यांचे घर आहे. ते रिक्षाचालक आहेत. त्यांची पत्नी आजारी असल्याने ते कुटूंबासह माहेरी राहण्यास गेले होते. या परिसरातील खत्री लॉन म्हाडा कॉलनीत असलेले मुस्ताक फकरुद्दीन सय्यद यांचाही रिक्षाचा व्यवसाय आहे.
ते कुटूंबासह हज यात्रेसाठी गेले आहेत. त्यांच्या घरासह रजिया दिलावर आटपाडे आणि कृष्णात बाटे यांच्या बंद घराचे कडी-कोयंडे चोरट्यांनी तोडून बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटले. बेपारी यांच्या घरी चोरी झालेचे सोमवारी पहाटे उघडकीस आले. त्यानंतर पाठोपाठ तीन ठिकाणाच्या घरफोड्या उघडकीस आल्या.
बेपारी यांच्या घरातील तीन तोळे दागिने, सात हजार रुपये रोकड, मुस्ताक सय्यद, रजिया आटपाडे आणि बाटे यांच्या घरातील दागिने व रोकड चोरीला गेल्याची चर्चा आहे. चौघांच्याही घरची परिस्थिती गरिबीची आहे. घरात चोरी झाल्याने सर्वजण हतबल झाले आहेत.दरम्यान घरफोडीची वर्दी मिळताच राजारामपूरीचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हैत्तर यांचेसह गुन्हे शाखेचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करुन चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. एकाच टोळीने चार ठिकाणी चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघा-चौघा चोरट्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत.