गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन व महागावच्या संत गजानन शिक्षण समूहातर्फे आयोजित गडहिंग्लज प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारच्या पाचव्या दिवशी जय-वरद स्पोर्टस् व साई एज्युकेशन संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून स्पर्धेत रंगत निर्माण केली आहे. जय-वरदच्या राहुल पाटील व हिरण्यकेशीच्या बालगंगाधर यांनी नोंदविलेल्या गोलची हॅट्ट्रिक बुधवारच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. गडहिंग्लजमधील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.पहिल्या चुरशीच्या सामन्यात जय-वरद संघाने सूर्या होंडा रायडर्स संघाचा ५-३ ने पराभव केला. जय-वरदच्या ओमकार बेळगुंदकर याने पहिला मैदानी गोल केला. सूर्या होंडाच्या प्रथमेश यादवनेही गोल करून सामना बरोबरीत आणला. वरुण भंडारीने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जय-वरदच्या ओमकारने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला.सामन्याच्या उत्तरार्धात जय-वरदचा कर्णधार राहुल पाटील याने जोरदार फटक्याद्वारे गोल नोंदवून सामन्यात ३-२ ने आघाडी घेतली, तर सूर्या होंडाच्या संदीप गोंधळीनेही हेडद्वारे गोल करून पुन्हा ३-३ असा सामना बरोबरीत आणला. मात्र, शेवटच्या मिनिटात राहुलने धडाकेबाज सलग दोन गोल करून संघाला ५-३ ने विजय मिळवून दिला.साई एज्युकेशन चॅलेंजर्सने गडहिंग्लज केमिस्ट रॉयल्सचा ३-१ ने पराभव केला. साईच्या सागर साळवी, ओमकार मस्के, गणेश पाटील यांनी गोल नोंदविले, तर केमिस्टच्या किरण कावणेकर याने एकमेव गोल नोंदविला.हिरण्यकेशी फौंडेशनने साई प्लाझा वॉरियर्सचा ४-१ ने पराभव केला. हिरण्यकेशीच्या बालगंगाधर याने तीन, तर अभिषेक सावंत याने एक गोल केला. साई प्लाझाच्या समीर पठाणने एकमेव गोल केला. (प्रतिनिधी)
‘जय-वरद’, ‘साई’चे आव्हान कायम
By admin | Published: May 20, 2015 11:29 PM