शिरोळ : येथील छत्रपती गादीचा वारसा असणारी ऐतिहासिक ‘जयभवानी’ नावाची तोफ प्रतिवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर पाच सलामी देत असते़ दसरा सीमोल्लंघनावेळी शिरोळच्या दक्षिणेला दसरा चौकात तीन सलामी, तर बुवाफन महाराजांच्या मंदिराजवळ उत्तरेला दोन तोफांची सलामी सोहळा होत असतो़ याशिवाय दर १२ वर्षांनी एकदा येणाऱ्या नृसिंहवाडी कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यातदेखील ही तोफ शुक्ल तीर्थावर धडाडणार आहे़शिवजयंतीच्या दरवर्षीच्या मिरवणुकीत शोभायात्रेतून ही तोफ कार्यक्रमाची भव्यता वाढवत असते़ परंतु, यावर्षी या तोफेचा सांगाडा नादुरुस्त झाला होता़ त्यामुळे यावर्षीच्या शिवजयंतीत ही तोफ पहिल्यांदाच मिरवणुकीत दिसली नाही़ तोफेच्या दुरुस्तीसाठी शिरोळ ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी तोफेची त्वरित दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना हा विषय शिरोळ ग्रामपंचायत सभागृहात मासिक सभेत मांडला होता़दरम्यान, येणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी ही तोफ ग्रामपंचायतीने दुरुस्त करून घेतली आहे़ तिचा लाकडी सांगाडा पूर्ण बदलून एक चाक देखील पूर्ण बदलले आहे़ शिरोळ येथील बसवण्णा कळसाप्पा लोहार यांनी दुरुस्तीचे हे महत्त्वपूर्ण काम केले आहे़ गेली ३५ वर्षे तोफेच्या दुरुस्तीचे काम हे केरबा लोहार करतात़ सध्या या तोफेची दुरुस्ती पूर्ण झाली असून, रंगरंगोटीचे काम सुरू आहे़ (प्रतिनिधी)
‘कन्यागत’मध्ये जयभवानी तोफ
By admin | Published: June 24, 2016 12:26 AM