कोल्हापूर : शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हातकणंगलेतून आपल्या मुलास उमेदवार देणार होते. मात्र त्यांना विजय आणि यशाची खात्री नसल्याने ऐनवेळी सत्यजित पाटील यांच्या रूपाने त्यांनी दुसऱ्याचा बळी दिला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी गुरुवारी इचलकरंजीत पत्रकारांशी बोलताना केला.ते म्हणाले, सन २०१९ मध्ये पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मैदानात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने ऐरणीवर आणले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील २९ साखर कारखानदार कुटुंबांच्या घशातून ऊस दराचे ६०० कोटी रुपये १५ लाख शेतकऱ्यांना मिळवून दिले.भाजपविरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडीकडे हातकणंगलेतून उमेदवार नव्हता. म्हणून मला महाविकास आघाडीकडून लढण्याचा आग्रह होता. मात्र मी तत्वासाठी लढतोय. स्वार्थासाठी नाही. म्हणून स्वतंत्रपणे रिंगणात आहे. सत्यजित पाटील हे साखर कारखानदारांचे उमेदवार आहेत. त्यांचे वडील अजूनही एका साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी आमदार असताना किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले हे विचारण्याची वेळ आली आहे.
इंडिया आघाडीत काही भाजपचे अवशेषइंडिया आघाडीत भाजपचे अवशेष शिल्लक आहेत. तेच माझ्याबद्दल चुकीचा प्रचार करीत आहेत. ते आता इंडिया आघाडीत असले तरी लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये जातील, असा अंदाज शेट्टी यांनी व्यक्त केला.