कोल्हापूर : महापालिकेने तीन दिवसांपूर्वी जयंती नाल्यातील दूषित पाणी तटविण्यासाठी बंधाऱ्यावर खरमातीची ठेवलेली पोती पुन्हा पावसामुळे वाहून गेली. यातच कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रच बंद असल्याने जयंती नाला पुन्हा ‘ओव्हर फ्लो’ झाला. जयंती नाल्यातील दूषित पाण्यावरून आंदोलन व प्रदूषण मंडळाच्या नोटिसींचा महापालिकेवर धडका सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच नाला नदीत मिसळल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. मैलामिश्रित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शहरात गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जयंती नाला नेहमीप्रमाणे ओसंडून वाहून पंचगंगा नदीत मिसळत आहे. तीन दिवसांपूर्वी महापालिकेने नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी ठेवलेली वाळू, मातीची पोती या पावसाच्या तडाख्यात वाहून गेली. परिणामी, गेल्या ४८ तासांत शहरातील मैलामिश्रितसांडपाणी प्रक्रियेविनाच नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. चार महिन्यांत जयंती नाल्यातील सांडपाणी थेट नदीत मिसळण्याचा प्रकार अनेकवेळा घडला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना ऐन पाावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्याने नाला नदीत मिसळत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. जयंती नाल्यातील पाणी हलक्याशा पावसातही नदीत मिसळत असल्याने बंधाऱ्यावर पोत्यात माती, वाळू भरून बंधाऱ्याची उंची तात्पुरती वाढविण्याचा दोनवेळा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा ही पोती पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही सांडपाण्याचा प्रवाह नदीत मिसळणे सुरूच राहिले. (प्रतिनिधी)
जयंती नाला पंचगंगेत, ‘एसटीपी’ अद्याप बंदच
By admin | Published: June 07, 2015 1:05 AM