इंदुमती गणेशकोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेतील मानाचे पान आणि या सिनेसृष्टीतील अध्वर्यू भालजी पेंढारकर यांची शेवटची आठवण असलेला जयप्रभा स्टुडिओ दोन वर्षापूर्वीच म्हणजे ३ जुलै २०२० रोजी ६ कोटी ५० लाखांना विकला गेला आहे.
लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकाबाबत चर्चा सुरू असताना कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोल्हापूरकरांना अंधारात ठेवून ही मालमत्ता खासगी संस्थेला विकण्यात आली. त्यामुळे जयप्रभा आणि लतादीदी यांचा संबंधही संपुष्टात आला. श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या भागीदारी फर्मने हा स्टुडिओ विकत घेतला असून, यात कोल्हापुरातील राजकीय नेत्याच्या मुलांचा समावेश आहे.अवघं जग कोरोनाशी झुंजत असताना इकडे जयप्रभा स्टुडिओची हेरिटेज वास्तू, मोकळी जागा व परिसरातील सगळ्या इमारती जुना वाशी नाका येथील श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपीतर्फे वटमुखत्यारदार सचिन श्रीकांतराव राऊत यांनी विकत घेतल्या आहेत. भागीदारीत एकूण दहाजणांसह राजकीय नेत्याच्या दोन मुलांची नावे आहेत.
दुय्यम निबंधक यांच्या दप्तरी झालेल्या नोंदीनुसार लता मंगेशकर यांच्या नावे असलेल्या जयप्रभा स्टुडिओची १२ हजार १२२ चौरस मीटर ही मिळकत व त्यावरील स्टुडिओचे दगड, विटा, मातीचे कौलारू बांधकाम, पत्रारुफचा तळ मजला, पहिला मजला या खुल्या व बांधीव मिळकतीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार १५ फेब्रुवारी २०२० रोजी झाला. तर मालमत्ता पत्रकावर त्याची ३ जुलै २०२० रोजी नोंद झाली आहे. लता मंगेशकर यांच्या वतीने उषा मंगेशकर यांनी या जागेचा व्यवहार केला.लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक कोल्हापुरात त्यांच्याच मालकीच्या जयप्रभा स्टुडिओत करण्याची मागणी जोर धरत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिली तर आम्ही ‘जयप्रभा’मध्ये त्यांचे स्मारक करू असे जाहीर केले; पण या स्टुडिओची मालकीच आता मंगेशकर कुटुंबाकडे राहिलेली नाही, त्यामुळे आता स्मारक करणार कुठे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तुकडे पाडत विक्री- कोल्हापुरात सिनेसृष्टी बहरावी, यासाठी राजाराम महाराज यांनी १९४७ मध्ये जयप्रभा स्टुडिओची जागा रायबा चागळे यांना दिली होती. त्याचवर्षी भालजी पेंढारकर यांनी पत्नी लीलाबाई पेंढारकर यांच्या नावे ५० हजार रुपयांना ही जागा विकत घेतली.
- भालजी आर्थिक अडचणीत आल्यानंतर १९६० मध्ये लता मंगेशकर यांनी ६० हजारांना स्टुडिओ विकत घेतला. त्यानंतर २००८ मध्ये लता मंगेशकर यांनी विकेश ओसवाल यांना स्टुडिओचा काही भाग विकला.
- त्यानंतर सातत्याने जयप्रभाचे विभाजन करून हळूहळू स्टुडिओच्या आवारातील सगळी मोकळी जागा विकण्यात आली. आता हेरिटेज इमारतींसह अख्खा स्टुडिओच विकला गेला आहे.
खरेदीसाठीच फर्म स्थापन- महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या संस्थेची नोंदणी ३ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आली. पुढे नऊ महिन्यांत जयप्रभाच्या खरेदी-विक्रीचा करार झाला.
- जयप्रभा स्टुडिओ वाचावा म्हणून एकीकडे कोल्हापूरकर गेली १०-१२ वर्षे आंदाेलने करत आहेत, मोर्चा, निषेध, कोर्ट कचेरी, न्यायालयाचे निर्णय, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केलेले प्रयत्न हा सगळा जयप्रभाच्या लढ्याचा इतिहास आहे.
- असे असताना दुसरीकडे कोल्हापूरकरांंनीच तथाकथित स्टुडिओच्या नावाखाली जयप्रभाची वास्तू खरेदी केली, हे दुर्दैव म्हणावे लागेल. खरेदीपत्रात मात्र संगीत, नाट्य, कला क्षेत्रासाठी असा उद्देश देण्यात आला आहे.
संस्थेचे भागीदार असे आहेतश्री महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपीतर्फे वटमुखत्यारदार सचिव श्रीकांत राऊत, (रा. जुना वाशी नाका) हे असून, अन्य भागीदारांमध्ये महेश अमृतलाल बाफना-ओसवाल, सय्यम नरेंद्रकुमार शहा, हितेश छगनलाल ओसवाल, पोपटलाल खेमचंद शहा-संघवी, राजू रोखडे, रौनक पोपटलाल शहा संघवी, ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर, आदिनाथ शेट्टी यांचा समावेश आहे.हेरिटेज वास्तूचे जतन करावे लागणारसध्या स्टुडिओच्या दोन इमारती उभ्या आहेत. त्यातील एकाची पडझड झाली आहे. या दोन इमारती महानगरपालिकेने तयार केेलेल्या हेरिटेज वास्तूंच्या यादीत समावेश आहे. त्यामुळे त्याचे जतन करावेच लागणार आहे; पण उर्वरित जागेवर गृहप्रकल्प तसेच व्यावसायिक इमारती उभारल्या जाण्याची शक्यता आहे.