कोल्हापूर : आठव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्यानिमित्ताने प्रसिद्ध मल्याळी दिग्दर्शक जयराज यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर, तर संकलक विद्याधर पाठारे यांना चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.महोत्सव संयोजन समितीच्यावतीने चंद्रकांत जोशी आणि दिलीप बापट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र शासन पुरस्कृत व कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने १२ ते १९ मार्च या कालावधीत लक्ष्मीपुरीतील आयनॉक्स थिएटरवर हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.जयराज हे व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरतील व कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट बनवितात. शेक्सपिअरच्या आॅथेल्लोचे रूपेरी पडद्यावरचे रूपांतरण त्यांनी ‘देसदानन’(१९९७) या चित्रपटाद्वारे केले. विद्याधर पाठारे यांनी गेल्या ३५ वर्षांत श्याम बेनेगल, विजया मेहता, गोविंद निहलानी, कल्पना लाजमी अशा दिग्गजांच्या मालिकांसाठी तर विविध हिंदी, मराठी चित्रपटांसाठी संकलक म्हणून काम केले आहे.गुरुवारी १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याचवेळी बाबूराव पेंटर पुरस्काराचे मल्याळी दिग्दर्शक जयराज यांना वितरण करण्यात येणार आहे. १५ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता लघुपट स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार असून यावेळी आमदार ऋतुराज पाटील, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष बोरकर उपस्थित राहणार आहेत.महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी १९ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पाठारे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रमुख प्रकाश मगदूम उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवामध्ये विविध भाषांतील ४५ प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट, तर ६६ लघुपट दाखवण्यात येणार आहेत.
या महोत्सवासाठी विविध चित्रपटांचे दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. थिएटरवरच या महोत्सवासाठी प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी अनघा पेंढारकर, श्रीकांत देसाई उपस्थित होते.पेंटर यांचे दुर्मिळ चित्रीकरणबाबूराव पेंटर यांनी पहिला कॅमेरा बनवला आणि त्याची कोल्हापूर परिसरातील अनेक घटना चित्रीत करत चाचणी घेतली. यातील १९१८ आणि १९३३ साली त्यांनी केलेले दोन चित्रीकरणाच्या फिती उपलब्ध झाल्या असून त्या फिती महोत्सवाच्या समारोपावेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहेत.