संदीप बावचे-- जयसिंगपूर -शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने १०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा संकल्प करून औपचारिकरीत्या आगामी नगरपालिका निवडणुकीचा नारळ फोडला आहे़ विरोधी आघाडीची मोट कशी बांधण्यात येते, यावरच निवडणुकीत रंग भरणार आहे़ निवडणुका आठ महिन्यांवर असल्या तरी सत्ताधारी गटाने डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे़मतदार नोंदणी अभियानानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे़ येत्या जून-जुलैमध्ये प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे़ डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे़ त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्येच पालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे़नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने विकासाची गती वाढवून तब्बल १०० कोटींची विकासकामे करण्याची घोषणा केली आहे़ भुयारी गटार योजनेसाठी सुमारे दहा कोटी रुपये, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, तसेच म्युझियमसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याबरोबर रस्ते, पाणी योजनेच्या कामांना गती देण्यासाठी निधीचे नियोजन करण्यात आले आहे़ एकूणच शताब्दी वर्षाचा मुहूर्त साधून सत्ताधारी आघाडीने आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़ विरोधकांची मोट बांधली जाणार, हे गृहीत धरूनच विकासकामांतून त्यांना उत्तर द्यायचे, अशी तयारी सत्ताधारी गटाकडून सुरू असल्याचे दिसून येते. येणाऱ्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका तसेच शिवसेना, भाजप, शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कोणता निर्णय घेतील, यावरच विरोधी आघाडीची मोट बांधली जाणार आहे़ कोल्हापूर महापालिकेप्रमाणे पक्षीय चिन्हांवर निवडणुका लढल्या जातील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीनंतर गोकुळ दूध संघ, केडीसीसी बँक आणि विधान परिषद या निवडणुकीतून राजकारणाचा तालुक्यात बराच ऊहापोह झाला आहे़ यामुळे आगामी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक विविध कारणांनी गाजणार, हे मात्र निश्चित असले तरी सत्ताधारी आघाडीने विकासकामांतून नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आतापासून प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल़विकास साधण्याचे आव्हानशताब्दी वर्षामध्ये जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीसमोर आहे़ गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आघाडीला यश आले आहे़ अवघ्या आठ महिन्यांवर आलेल्या पंचवार्षिक निवडणुका लक्षात घेऊन आतापासूनच आघाडीकडून व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे़
जयसिंगपूर पालिकेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी
By admin | Published: March 10, 2016 11:13 PM