जयसिंगपूर : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद रविवारी जयसिंगपूरात उमटले. अज्ञातांनी बसस्थानक शेजारी असणाऱ्या क्रांती चौकात एस.टी.वर दगडफेक केली. एस.टी.वर झालेल्या दगडफेकीमुळे येणाºया बसेस बसस्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी वर्गाची मोठी गैरसोय झाली. या गोंधळामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.मराठा समाजाला संघर्षाशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत, त्यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, असा इशारा देत मराठा समाजबांधवांच्यावतीने आंदोलने सुरु झाली आहेत. येथील सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात लाक्षणिक आंदोलनासाठी आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, मराठा आंदोलनाचे पडसाद रविवारी जयसिंगपूरातही उमटले. कुरुंदवाडहून सांगलीकडे निघालेल्या एस.टी. (क्र.एमएच ४० एन ९३४७) वर क्रांती चौकात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एस.टी.दर्शनी बाजूची काच फुटली. अज्ञातांनी केलेल्या अचानक या दगडफेकीमुळे महामार्गावर तणावपूर्ण वातावरण बनले होते. एस.टी.वर दगडफेक झाल्याचे वृत्त समजताच सांगलीहून कोल्हापूरकडे येणाºया बसेस येथील बसस्थानक परिसरात थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी वर्गाची मोठी गैरसोय झाली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरु होता. महामार्गावरदेखील मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अखेर जयसिंगपूर पोलिसांनी हस्तक्षेप करुन वाहतुक सुरळीत करुन बसेस मार्गस्थ केल्या. कुरुंदवाड आगाराचे एस.टी.चालक नितीन वाघमारे यांनी एस.टी.नुकसानप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.