जयसिंगपूर : आगामी नगरपालिकेसाठी जनतेतून निवडून देण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडण्याआधीच इच्छुकांच्या कुरघोड्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. तब्बल पंधरा वर्षांनंतर जयसिंगपूरकरांना नगराध्यक्ष निवडण्याची संधी मिळणार असली तरी नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील नावांची संख्या वाढू लागली आहे. अजून तुरी बाजारात आहे, तोपर्यंत पालिका वर्तुळात चर्चेची मारामारी सुरू झाली आहे. जयसिंगपूर शहरात १२ प्रभागांतून २४ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. प्रभाग रचना व आरक्षण निश्चित झाले आहेत; परंतु नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाचे घोंगडे शासनाच्या दरबारात भिजत पडले आहे. पावसाळी अधिवेशनात हे आरक्षण निश्चित होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चाच राहिली आहे. नगराध्यक्ष निश्चिती अगोदरच सत्ताधारी व विरोधी गटामधील काही मातब्बर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून पदाच्या बोहल्यावर चढले आहेत. खुल्या प्रभागातून आरक्षण जाहीर झाल्यास सत्ताधारीबरोबरच विरोधी गटातून अनेकांची नावे चर्चेत आहेत. तर ओबीसी महिला आरक्षण पडल्यास सत्ताधारीमधील एक गट विरोधकांना घेऊन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जयसिंगपूरकर म्हणून नवी आघाडी स्थापन झाल्याची चर्चा आहे. या आघाडीत स्वाभिमानी, भाजप, महाडिक गटाला सामावून घेण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर सत्ताधाऱ्यांना एकास एक लढत देण्यासाठी शिवसेनेलाही सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या सारीपाटात नगराध्यक्ष पदाचे आरक्षणही तितकेच महत्त्वाचे मानले जात असल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांत सध्या कुरघोड्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षणच या राजकीय घडामोडींना ब्रेक देईल, असेच संकेत आहेत. (प्रतिनिधी)तब्बल पंधरा वर्षांनंतर जयसिंगपूरकरांना नगराध्यक्ष निवडण्याची संधी मिळणार असली तरी नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील नावांची संख्या वाढू लागली आहे.
जयसिंगपुरात सत्ताधारी विरोधकांत कुरघोड्या
By admin | Published: August 22, 2016 11:57 PM