गडहिंग्लज :गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे जनता दलाचे नगरसेवक महेश बसवराज कोरी यांची निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या सावित्री पाटील यांचा त्यांनी तब्बल १० मतांनी पराभव केला.कोरींना १५ तर पाटील यांना केवळ ५ मते मिळाली.मावळत्या उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे यांनी राजीनामा दिल्याने पालिकेच्या विशेष सभेत ही निवडणूक झाली.अध्यक्षस्थानीपीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रक्रियेव्दारे मतदान नोंदविण्यात आले.
प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार दिनेश पारगे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. नरेंद्र भद्रापूर हे कोरी यांचे सूचक तर उदय पाटील हे अनुमोदक होत्या.शुभदा पाटील या पाटील यांच्या सूचक तर रेश्मा कांबळे या अनुमोदक होत्या. नूतन उपनगराध्यक्ष कोरी हे जनता दलाचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांचे जावई आहेत.त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार उभा केल्यामुळे या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी शहरात दुचाकीवरून विजयी मिरवणूक काढली. कुणाचे मत कुणाला.. ?'जद'च्या कोरी यांना नगराध्यक्षा प्रा. कोरी, नगरसेवक बसवराज खणगावे राजेश बोरगावे,उदय पाटील, नितीन देसाई,नरेंद्र भद्रापूर, शकुंतला हातरोटे, क्रांती शिवणे,सुनिता पाटील,वीणा कापसे,नाज खलिफा,शशीकला पाटील यांच्यासह भाजपाचे दीपक कुराडे व शिवसेनेच्या श्रद्धा शिंत्रे यांनीही मतदान केले. 'राष्ट्रवादी'च्या पाटील यांना हारूण सय्यद, शुभदा पाटील, रुपाली परीट, रेश्मा कांबळे यांनी मतदान केले.'गडहिंग्लज'मध्ये इतिहास घडला..!नूतन उपनगराध्यक्ष कोरी हे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांचे पती आहेत.गेल्या वर्षी वाढीव प्रभागातील निवडणुकीत ते विक्रमी मताधिक्यांनी निवडून आले आहेत.त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली.त्यामुळे गडहिंग्लज नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नी नगराध्यक्ष आणि पती उपनगराध्यक्ष असण्याचा बहुमान या दाम्पत्याला मिळाला. पहिल्यांदाच निवडणूक..!चार वर्षांत उपनगराध्यक्षपदासह विषय समिती सभापतीपदाच्या निवडीदेखील बिनविरोध पार पडल्या.यावेळी काहीतरी 'चमत्कार' घडेल या आशेने 'राष्ट्रवादी'ने निवडणूक लढवली.परंतु,त्यांच्या पदरी निराशाच आली.