कोल्हापूर : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ग्राहकाभिमुख अशा विविध योजना आणल्यामुळे अल्पावधीतच बँक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे. नुकतीच सुरू केलेली जीवन प्रमाण योजनही यामधीलच एक भाग आहे. घरातूनच हयातीचा दाखला मिळणारी ही योजना सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना आधार ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या दीड महिन्यात २१०० निवृत्त कर्मचाऱ्यांनी हिचा लाभ घेतला आहे. मुख्यत्वे दिव्यांग, आजारी, वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला देणे बंधनकारक आहे. दिव्यांग, आजारी, वयोवृद्ध आणि जुने घर सोडून दुसरीकडे राहण्यास गेलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हा दाखला संबंधित विभागाला देणे अडचणीचे होते. ग्रामीण भागातील निवृत्त कर्मचाऱ्यांना तर १० ते १५ किलोमीटर अंतरावरील कार्यालयात जाऊन दाखले जमा करावे लागत होते. यामध्ये त्यांना पायपीट करावी लागत होती. आता त्यांना घरात बसूनच दाखला देण्याची सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने जीवन प्रमाण योजनेंतर्गत आणली आहे.
प्रतिक्रिया
निवृत्त कर्मचाऱ्यांना घराजवळीलच पोस्ट ऑफिस जीवन प्रमाणपत्र पाहिजे असल्याचे कळविल्यानंतर अथवा पोस्ट इन्फो ॲपमध्ये ही सुविधा पाहिजे असल्याचा संदेश पाठविल्यास पोस्टमन घरी येऊन हा दाखला पाच मिनिटांत देतो. बायोमेट्रिक आधारित डिजिटल सेवा असल्याने आपोआप पेन्शन देणाऱ्या संबंधित विभागात अथवा बँकेत हे प्रमाणपत्र अपडेट होते.
अमोल कांबळे, वरिष्ठ शाखा प्रबंधक, पोस्ट बँक, कोल्हापूर शाखा
चौक़ट
जीवन प्रमाणसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मोबाईल नंबर, पीपीओ नंबर
चौकट
जीवन प्रमाण योजनेची सुरवात : ३१ ऑक्टोबर
जिल्ह्यात सरकारी निवृत्त कर्मचारी : सुमारे १० हजार
पोस्ट बँकेचे ग्रृाहक : २ लाख ७५ हजार
जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस : ५६३
पोस्टमन : ७६१
दखल्यासाठीचा खर्च : केवळ ७० रुपये
वेगळे बॉक्स करणे
खाते नसणाऱ्यांसाठीही अच्छे दिन
अनेकजण कामानिमित्त दुसऱ्या शहरात जातात. त्यांना घरी कुटुंबीयाना पैसे पाठवयाचे असातत. कागदपत्र नसल्यामुळे त्यांना बँक खाते काढता येत नाही. अशा लोकांच्या सोयीसाठी पोस्ट पेमेंट बँकेने ‘डोमेस्टिक मनी ट्रान्स्फर सेवा’ मंगळवारपासून सुरू केली आहे. यामुळे ज्यांचे पोस्ट पेमेंट अथवा कोणत्याच बँकेत खाती नाहीत, त्यांनाही पेमेंट बँकेतून पैसे ट्रान्स्फर करता येणार आहे. यामध्ये पॅन कार्ड नसणाऱ्यांना एक व्यवहार पाच हजार रुपये तर दिवसाला २५ हजार रुपये ट्रान्स्फर करता येते. जे केवायसी देतील त्यांना इतर बँकेत दिवसाला ४९ हजार ९९९ रुपये पाठविता येणार आहेत. यासाठी केवळ १० रुपये किंवा एकूण रकमेच्या एक टक्का रक्कम जमा करण्याचा खर्च आहे.
आता ऑनलाईन शॉपिंग खरेदीची सुविधा
पेमेंट पोस्ट बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी व्हर्च्युअल डेबिट कार्ड सेवा दोन दिवसांपासून सुरू केली आहे. यामुळे खातेदारांना ऑनलाईन शॉपिंग, गुगल पे, मोबाईल बँकिंग, रक्कम ट्रान्स्फर करणे, फास्ट टॅग रिचार्ज करणे अशा सुविधा मिळत आहेत.