कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील १५० ग्रॅम दागिने आणि ठिकठिकाणी गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेऊन ते फिर्यादींना परत करण्याचे काम करवीर पोलिसांनी बुधवारी (दि. १३) केले. साडेतीन लाख रुपयांचे ३५ मोबाइल आणि नऊ लाख रुपयांचे दागिने परत मिळाल्याने फिर्यादींना दिलासा मिळाला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत मुद्देमाल परत करण्यात आला.
कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील पसार दरोडेखोर अंकित शर्मा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून, त्याच्याकडून दरोड्यातील १५० ग्रॅम दागिने जप्त केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर हे दागिने बुधवारी कात्यायनी ज्वेलर्सचे मालक रमेश शंकर माळी (रा. बालिंगा) यांना परत करण्यात आले. करवीर पोलिसांनी गेल्या महिनाभरात सायबर पोलिसांच्या मदतीने गहाळ मोबाइलचा शोध घेण्याची मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून ३५ मोबाइलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सुमारे साडेतीन लाख रुपयांचे मोबाइल आणि नऊ लाखांचे दागिने असा साडेबारा लाखांचा मुद्देमाल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते परत करण्यात आला.
जिल्ह्यातील घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मुद्देमाल परत मिळविण्यास प्राधान्य दिले जात आहे. फिर्यादींना त्यांचा ऐवज, मुद्देमाल परत मिळावा, यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे निरीक्षक अरविंद काळे, आदी उपस्थित होते.