येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून दिला जाणारा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ अर्थतज्ञ व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांना जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी १ सप्टेंबर रोजी पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रा. पाटील यांनी दीर्घकाळ शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्याशिवाय विद्यापीठ व सामाजिक संस्था, सरकारच्या विविध मंडळांवर सदस्य म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य होते. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांची इंग्रजी व मराठीमध्ये अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून विविध वृत्तपत्रातून व मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत.
डॉ. प्रा. पाटील यांच्या या निवडीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.