कोल्हापूर : लक्ष्मीपुरी धान्य व्यापारपेठ येथे दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये ग्राहकांचे मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास रविवारी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित दिलावर नसरूद्दीन शेख (वय १९, रा. तैलझाडी, झारखंड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. लक्ष्मीपुरी धान्य व्यापारपेठ येथे आठवडा बाजार दर रविवारी भरतो. ग्राहकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत या ठिकाणी सराईत चोरटे ग्राहकांचे मोबाईल हातोहात लंपास करतात. रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान दीपक वसंतराव ओतारी (रा. शुक्रवार पेठ), संजय मधुकर पेंडसे (रा. शाहूपुरी तिसरी गल्ली) या ग्राहकांचे किमती मोबाईल चोरीला गेले. या प्रकरणी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल भरत कांबळे, संदीप कापसे, अजित वाडेकर, विजय देसाई, राहुल देसाई यांनी गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिर व लक्ष्मीपुरी बाजारात पाळतठेवली असता संशयितरीत्या फिरताना शेख याला अटक केली. त्याच्याजवळील खिशामध्ये तपासणी केली असता तीन मोबाईल आढळून आले. दरम्यान, यापूर्वीही या बाजारामध्ये अनेक ग्राहकांचे मोबाईल चोरीस गेले आहेत. यापूर्वीच्या मोबाईल चोऱ्या शेखने केल्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी) झारखंडमधून टोळी कोल्हापुरात झारखंड येथून १६ ते २७ वयोगटातील दहा ते पंधरा तरुण रेल्वेने कोल्हापुरात आले आहेत. ते खोली घेऊन भाड्याने राहतात. काहीवेळा स्टेशन रोडवरच रात्र काढतात. दिवसभर मध्यवर्ती बसस्थानक, चित्रपटगृहे, बाजार, आदी ठिकाणी लोकांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करतात. या टोळीतील एक अल्पवयीन मुलगा लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाला आहे. त्याने झारखंड येथून आलो असून दहा ते पंधरा जणांची टोळी असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस अन्य तरुणांचा शोध घेत आहेत.
झारखंडच्या मोबाईल चोरट्यास अटक
By admin | Published: June 20, 2016 12:43 AM