कोल्हापूर : ‘जिंगल बेल... जिंगल बेल, जिंगल आॅल द वे’ ही गाणी... विविध चर्चवर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई... फटाक्यांची आतषबाजी, आकर्षकरीत्या सजवलेले ख्रिसमस ट्री, गिफ्टचे वाटप, शांततेचा संदेश, प्रार्थना सभा अशा विविध कार्यक्रमांनी ख्रिश्चन बांधवांनी नाताळचा सण उत्साहात साजरा केला. याशिवाय सोशल मीडियावरूनही दिवसभर शुभेच्छा संदेश फिरत होते. प्रभू येशूंचा जन्मदिन म्हणजे २५ डिसेंबर. हा दिवस नाताळ (ख्रिसमस) म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर शहरात ख्रिस्ती बांधवांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील सर्वच चर्चमध्ये नाताळची तयारी सुरू होती; तर गेले तीन दिवस कॅरोल ग्रुप घरोघरी जाऊन नाताळची गाणी गात होते. रात्री १२ वाजता फटाके वाजवून नाताळचे स्वागत करण्यात आले आणि मध्यरात्रीपासूनच सर्व चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आल्या. न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्च येथे सकाळी आठ वाजल्यापासून इंग्रजी उपासना, मराठी उपासना झाली. चर्च पास्टर्स डी. बी. समुद्रे व संजय चौधरी यांनी विशेष प्रार्थना करून संदेश दिला. विक्रमनगर चर्चमध्ये आर. आर. मोहिते, संजय धनवडे यांनी संदेश दिला. नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, रेसिडेन्सी क्लब येथील आॅल सेंट चर्च, होली क्रॉस चर्च, विक्रमनगर येथील चर्च तसेच ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर या चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते.
जिंगल बेल धूनवर नाताळची धूम
By admin | Published: December 25, 2014 11:04 PM