कोल्हापूर : गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केलेल्या अपना जॉब ॲपवर नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर शिरीष सुनील जोशी (वय २३, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) या तरुणाची चार लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार २३ फेब्रुवारी ते १८ एप्रिल दरम्यान घडला. याबाबत जोशी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित सचिन आणि अंशुल सिंग (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.फिर्यादी शिरीष जोशी हे एका कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर नवीन नोकरीच्या शोधात होते. यासाठी त्यांनी मोबाइलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून अपना जॉब या नावाचे ॲप डाऊनलोड केले. ॲपद्वारे नोकरीसाठी अर्ज केला. फेब्रुवारी महिन्यात त्यांना सचिन नावाच्या व्यक्तीचा फोन आला. अपना जॉबमधून बोलत असल्याचे सांगून त्याने कोल्हापुरातील एका बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर संशयित सचिन आणि अंशुल सिंग या दोघांनी वारंवार फोन करून नोकरीसाठी चार लाख रुपयांची मागणी केल. संशयितांनी दिलेल्या बँक खात्यांवर जोशी यांनी १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सुमारे चार लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर संशयितांनी कुरिअरद्वारे नियुक्ती पत्र पाठवले. मात्र, शाहूपुरी येथील बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी केल्यानंतर जोशी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
ॲपवरून नोकरीचे आमिष; कोल्हापुरातील तरुणाची चार लाखांची फसवणूक
By उद्धव गोडसे | Published: August 08, 2024 5:57 PM