कोल्हापूर : येथील नोकरी आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक दिलीप नारायण गुळवणी (वय ६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने महाद्वार रोड येथील वांगी बोळातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कदमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली, मुलगा कृष्णकांत, मुलगी धनश्री, नातू असा परिवार आहे. शासकीय नोकरीसाठी प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक हरपले; चांगला माणूस निघून गेला, अशा प्रतिक्रिया गुळवणी यांच्या निधनानंतर व्यक्त झाल्या.गुळवणी यांनी सोमवारी (दि. ७) रात्री नऊपर्यंत स्टॅम्प लिहिण्याचे काम केले. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे उठले. काही वेळाने त्यांना अचानक थंडी वाजून आली. अस्वस्थ वाटू लागले. त्यातच हृदयविकाराच्या धक्क्याने सकाळी साडेसहा वाजता त्यांचे निधन झाले. गुळवणी काका या नावाने ते परिचित होते. त्यांचा स्वभाव बोलका होता. वांगी बोळ येथील राहत्या घरी ते स्टॅम्प विक्री करायचे.
सन १९८३ मध्ये त्यांनी नोकरी मार्गदर्शन केंद्राची सुरुवात केली. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेच जेव्हा तरुणांना माहीत नव्हते, तेव्हा त्यांचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेची सर्व माहिती ते देत होते. अनेकदा पदरचे पैसे घालून त्यांनी अनेक मुलांचे परीक्षा शुल्क भरले.
मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज जमा केले. त्यांच्या या मदतीमुळे कोल्हापूर आणि परिसरातील अनेकजण पीएसआय, तहसीलदार अशा विविध शासकीय पदांवर, बँक आणि एलआयसीमधील अधिकारी म्हणून नोकरीत लागले. मोबाईल, इंटरनेट नसलेल्या काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ते आधार होते.अनेकांची नोकरीची स्वप्ने सत्यात उतरविलीअंबाबाई मंदिर परिसरातील वांगी बोळामधील गुळवणी वाड्यातील छोट्या खोलीत दिलीप गुळवणी यांचे नोकरी मार्गदर्शन केंद्र होते. शासकीय, बँकिंग, एलआयसीतील भरतीच्या वर्तमानपत्रांतील जाहिरातींचे कात्रण ते या केंद्रातील दर्शनी भागातील फलकावर लावायचे.
या भरतीचे अर्ज भरून घेऊन ते पोस्टाने पाठविण्याचे कामही ते करायचे. या कामासाठी पाच ते दहा रुपये ते घ्यायचे. अनेकांची शासकीय, निमशासकीय, बँकिंग, आदी क्षेत्रांतील नोकरीची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी ते धडपडत राहिले. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांचे काम अविरतपणे सुरू होते.