कोल्हापूर : फेसबुक अकाउंटवर परदेशात नोकरीची जाहिरात पाठवून नोंदणी शुल्क, व्हिजा स्टॅम्प शुल्क, वैद्यकीय फीच्या नावाखाली एक लाख १३ हजार ५७५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. २६ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. प्रकाश दादू पाटील (वय ५१, रा. हिराश्री लेक सिटी, रंकाळा पार्क) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी सायबर पोलिसांत संशयित जोसेफ पॉम्पर याच्याविरोधात फिर्याद दाखल केली.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जोसेफ पॉम्पर या नावाच्या व्यक्तीने फिर्यादी प्रकाश पाटील यांच्या फेसबुक अकाउंटवर नोकरीची जाहिरात पाठविली. त्यांचा बायोडाटा घेऊन परदेशात गॅस प्लॅँटसाठी एका कंपनीची चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे भासविले. त्यासाठी त्यांची ई-मेलद्वारे परीक्षा घेऊन त्यात ते उत्तीर्ण झाल्याचेही सांगितले. त्यांना आॅफर लेटर आणि करारपत्र त्यांच्या ई-मेलवर पाठविले. त्यांच्याकडून नोंदणी शुल्क, व्हिजा स्टॅम्प फी, वैद्यकीय चाचणीसाठी वेळोवेळी पैसे उकळले.
संशयिताने ही रक्कम बँक आॅफ महाराष्ट्राच्या खात्यात भरण्यास सांगितली. मात्र एक महिन्याच्या कालावधीनंतरही नोकरी मिळाली नसल्याने त्यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. संशयित जोसेफ याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करीत आहेत.